आम्हाला जे चिन्ह मिळेल ते दोन दिवसात घराघरात पोहोचवणार

0
385

पुणे ,दि १० (पीसीबी) – आधी आमदारांनी बंडखोरी केली. मग एक एक करत खासदारही शिंदे गटात सामील झाले. बघता शिवसेनेत उभी फूट पडली. आता तर शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हही गोठवण्यात आलंय. त्यावर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. यावर ठाकरे गटाच्या नेत्यांनी आपलं मत मांडलंय. पुण्यातील ठाकरे गटाच्या नेत्यांशी आम्ही संवाद साधला. त्यावेळी आजही शिवसेना खंबीर असल्याचं त्यांनी म्हटलंय.

ठाकरे गटातील नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांची आम्ही चर्चा केली. यावेळी हे कार्यकर्ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. काहींच्या डोळ्यात अश्रू आले. तर काहीजण आक्रमकपणे बोलताना दिसले.आम्हाला वाईट वाटत आहे, की आमचं इतक्या वर्षाच चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं. त्यांनी काहीही करु द्या. पण आमचं चिन्ह हे ठाकरे नावाचा ब्रँड आहे. हे त्यांनी विसरता कामा नये, असं ठाकरे गटाचे नेते म्हणालेत.जे काही चिन्ह आम्हाला नव्याने मिळेल. ते अवघ्या दोन दिवसात आम्ही घराघरात पोहोचवू, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.शिवसेनेचं नाव आणि चिन्ह आमच्या हृदयात आहे. ते स्थान कुणाही मिटवू शकणार नाही, असं ते म्हणालेत.२०१४ पासून भाजपने शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. उद्धवसाहेब ज्यावेळी म्हणाले की मी प्रबोधनकार ठाकरेंचा नातू आहे. त्यावेळी भाजपला हे वाक्य मनाला लागलं, असं हे नेते म्हणालेत.

अब्दुल सत्तार म्हणाले होते की, मला कुत्रा हे चिन्ह द्या, तरिही मी निवडून येईल.शिंदे गटाला आता हेच सांगतो की तुम्ही आता कुत्रं हेच चिन्ह निवडणूक आयोगाकडून मागून घ्या. सत्तारांना म्हणावं या निवडून!, असंही ठाकरे गटाचे हे नेते म्हणाले आहेत.शिवसेनेची पाळमुळ भक्कम आहेत.बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना हे नाव घराघरापर्यंत पोहचवलं.ते आजही लोकांचा पाठिंबा ठाकरेंसोबत आहे, असं ठाकरे गटाचे नेते म्हणालेत.हे गद्दार शिवसेनेसाठी काम करत होते की, अब्दालीचे सैन्य म्हणून काम करत होते?. बाळासाहेब धनुष्यबाण देव्हाऱ्यात ठेवून त्याला पुजत होते. तेच धनुष्यबाण शिंदेगटामुळे गोठवण्यात आलंय.