आम्हाला गृहीत धरू नका, पिंपरी चिंचवडच्या सोसायटीधारकांचा इशारा

0
65

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांकडून विविध फंडे लढवले जात आहेत. सोसायटीधारक हा निवडणुकीत निर्णायक मतदार आहे. त्यामुळे या मतदारांना आकर्षित करण्यासाठी सोसायटीमध्ये समस्या अधोरेखित करून, तिचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच सोसायटीधारकांना राजकीय नेते, कार्यकर्त्यांकडून बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याने ‘आम्हाला तुम्ही तुमचे कार्यकर्ते समजू नका’ असे फेडरेशनने आता सांगायला सुरुवात केली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे अडीच ते तीन हजार गृहनिर्माण सोसायट्या आहेत. शहरात सर्वच सोसायटी फेडरेशन सोसायटीधारकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. सोसायटीधारकांची वज्रमूठ आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुक राजकीय व्यक्ती सोसायटीधारकांच्या समस्या मीच सोडवणार असा दावा करीत आहेत. सोसायटीधारकांना तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी सोशल मीडियाचे प्रतिनिधी येत आहेत. आपल्या समस्या मांडा आणि सोडवण्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही मीडियासमोर बोला, असा सापळा रचला जात आहे. त्याच बाईट राजकीय हेतूने सोशल मीडियावर प्रसारित केल्या जात आहेत. मात्र, हे सोशल मीडियाचे प्रतिनिधी असून, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी नसल्याने यामध्ये सोसायटीधारक नाहक बदनाम होत आहेत. त्यामुळे सोसायटीधारकांनी राजकीय षडयंत्राचा बळी ठरू नये, असे आवाहन चिखली-मोशी-चऱ्होली- पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केले आहे.

संजीवन सांगळे म्हणाले की, १९९७ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत हद्दीलगतच्या गावांचा समावेश झाला. त्यानंतर समाविष्ट गावांमध्ये महानगरपालिका पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करेल, या अपेक्षेने नवीन गृहप्रकल्प होण्यास सुरुवात झाली. गृहप्रकल्पांना परवानगी देताना प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे पायाभूत सोयी-सुविधा सक्षमपणे तयार झाल्या नाहीत. गेल्या १० ते १५ वर्षांमध्ये गृहप्रकल्प आणि सदनिकाधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. बांधकाम व्यावसायिकांचे दुर्लक्ष, मनमानी आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी, पार्किंग, कचरा व्यवस्थापन, वीजपुरवठा, रस्ते, गार्डनसह ॲमिनिटीज अशा समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी शहरातील सर्वच सोसायटी फेडरेशन आपआपल्या परीने ताकदीने काम करीत आहेत.

सोसायटी फेडरेशननेच एकत्रितपणे सोडवले प्रश्न
सोसायटी फेडरेशनचे पदाधिकाऱ्यांनी पुनावळेतील कचरा डेपो रद्द केला. उपयोगकर्ता शुल्क वसुलीला स्थगिती दिली. चऱ्होलीतील प्रस्तावित कचरा हस्तांतरण केंद्राचे आरक्षण रद्द केले. मोशी कचरा डेपोवरील कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वीत केले. आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील १०० एमएलडी पाणी शहरात आणण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. अतिक्रमण, रस्ते, सार्वजनिक स्वच्छता असे अनेक विषय मार्गी लावले आहेत.

बांधकाम व्यावसायिक धार्जिणे राजकीय नेते आजच्या तारखेला सोसायटीधारकांच्या समस्यांचे राजकीय भांडवल करू पाहात आहेत. त्यासाठी विशिष्ट व्यक्ती सोसायटीधारकांच्या ‘व्हॉट्सॲप ग्रुप’मध्ये आवाहन केले जात आहे. प्रतिक्रियांचे व्हीडीओ तयार करून विशिष्ट राजकीय हेतूने सोशल मीडियावर प्रसारित केले जात आहेत. यातून सोसायटीतील अंतर्गत वातावरण कलुशित होत आहे. त्यामुळे आमचे या राजकीय नेत्यांना सांगणे आहे, आम्हाला गृहीत धरू नका आणि तुमचे कार्यकर्ते समजू नका. मतदार त्याला हवे त्यालाच मतदान करत असतो.
-संजीवन सांगळे, चिखली-मोशी-चऱ्होली सोसायटी फेडरेशन

शहरातील पाणी प्रश्नावर आम्ही जनहित याचिका दाखल केली. सोसायटीधारकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र आलो. ज्यावेळी हा निर्णय घेतला तेव्हाच आमचे फेडरेशन कोणा एका राजकीय पक्षाला अथवा नेत्याला बांधील नसेल, हा सर्वानुमते निर्णय घेतला होता. प्रश्न सोडवण्यासाठी निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांकडून समस्या सोडवून घ्याव्या लागतात. त्यामुळे आम्ही अनेकांना आमची निवेदने देऊन त्याचा पाठपुरावा करून विषय मार्गी लावले आहेत. लोकांना गृहीत धरणे आणि आम्ही कोणा एकालाच बांधील आहोत हे समजणे चुकीचे आहे.
-दत्तात्रय देशमुख, पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन