मुंबई, दि. २९ (पीसीबी) – महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप तापला होता. अखेर २७ जानेवारी रोजी राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढला आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या हाती सोपवला. राज्य सरकारने मराठा आंदोलकांच्या विविधं मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध सुरू झाला आहे. ओबीसी नेते आणि राज्यातील सत्ताधारी अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारविरोधात आवाज उठवला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचा निर्णय आपल्याला मान्य नसल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. यावर महायुतीतल्या महत्त्वाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
छगन भुजबळ म्हणाले, मी ओबीसींबाबत माझी भूमिका मांडत राहीन, मला सोबत घ्यायचं की नाही ते पक्षानं आणि महायुतीने ठरवावं. वेळ पडल्यास माझी पक्षातून बाहेर पडण्याची तयारी आहे. परंतु, मी माझा लढा चालू ठेवेन. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाची भूमिका मांडली आहे. फडणवीस म्हणाले, आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीदेखील तीच भूमिका आहे. आम्हाला ओबीसीचं आणि त्यांच्या हक्कांचं संरक्षण करावंच लागेल. मुख्यमंत्र्यांचंही तेच म्हणणं आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी राज्याला स्पष्टपणे सांगतो की, भारतीय जनता पार्टी या सरकारमध्ये आहे तोवर काहीही झालं तर आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. उद्या अशी वेळ आली की, आम्हाला ओबीसींना संरक्षण देता येत नाहीये. तर, मी स्वतः माझ्या वरिष्ठांशी बोलेन. काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल आणि हीच भाजपाची भूमिका आहे.
छगन भुजबळांच्या राज्य सरकारवरील नाराजीबाबत विचारल्यावर फडणवीस म्हणाले, माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की, त्यांनी संयम ठेवावा. मी लवकरच त्यांच्याशी चर्चा करणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर त्यांचे जे काही आक्षेप असतील ते त्यांनी सांगावे. कुठेही ओबीसींवर अन्याय होत असेल तर आपण त्यात परिवर्तन करू. आवश्यकता असेल तिथे सुधारणा करू. परंतु, ओबीसींवर अन्याय होऊ देणार आहे.