आमदार लांडगे यांच्या गडाला सुरुंग; भाजपचे पदाधिकारी गव्हाणे यांच्या प्रचारात

0
91
  • अजित गव्हाणे यांच्या प्रचारासाठी भाजपचे माजी क्रीडा सभापती लक्ष्मण सस्ते सरसावले
  • लांडगे यांना धक्का; मोशी परिसरात सस्ते कुटुंबीयांची ताकद
  • मोशी परिसरात अजित गव्हाणे यांची प्रचारात आघाडी

भोसरी, 5 ऑक्टोबर (प्रतिनिधी) :

भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे अजित गव्हाणे यांनी आणखी एक धक्का दिल्याचे दिसून आले. भाजपचे माजी क्रीडा सभापती लक्ष्मण सस्ते यांनी भाजपला ‘रामराम’ करत तुतारी फुंकण्याचा निर्धार केला आहे. याचीच परिणीती मोशी परिसरात दिसून आली. गव्हाणे यांच्या प्रचारात लक्ष्मण सस्ते यांनी पुढाकार घेतला असून, यामुळे मोशी परिसरात भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे.

भोसरी विधानसभेमध्ये प्रचाराचा वेग वाढला आहे. प्रचाराची रंगत वाढत असताना भाजपला मात्र मोठा धक्का बसला आहे. भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक, क्रीडा समितीचे माजी सभापती व माजी नगरसेवक लक्ष्मण सस्ते यांनी लांडगे यांना रामराम करत अजित गव्हाणे यांना पाठिंबा दिला आहे.याच पार्श्वभूमीवर लक्ष्मण असते हे गव्हाणे यांच्या प्रचारात उतरल्याचे दिसले.

मोशी भागामध्ये सस्ते कुटुंबीयांची मोठी ताकद आहे. सस्ते कुटुंबियांकडून गव्हाणे यांना पाठिंबा मिळाल्यामुळे या भागात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढल्याचे म्हटले जात आहे. लक्ष्मण सस्ते याप्रमाणेच आणखीही पदाधिकारी गव्हाणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे .

……

सुसंस्कृत नेता म्हणून गव्हाणे यांचे नेतृत्व मान्य – लक्ष्मण सस्ते

याबाबत लक्ष्मण सस्ते म्हणाले अजित गव्हाणे हे सुसंस्कृत उच्चशिक्षित आणि या शहराशी नाळ जोडलेले व्यक्तिमत्व आहे. गव्हाणे कुटुंबातील तिसरी पिढी या भागाचे प्रतिनिधित्व करत असून, भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या गरजा नक्की कोणत्या आहेत हे त्यांना माहीत आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी शहरातील अनेक पूल, ग्रेड सेपरेटर, पाण्याच्या टाक्या, रस्ते यांचे नियोजन केले. अनेक कामे मार्गी लावताना कोणत्याही बाबतीत त्यांच्या कामावर गालबोट लागलेले नाही. सुसंस्कृत नेता म्हणून आम्ही त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे. मोशीसारखा मोठ्या प्रमाणात विकसित होत असलेला भाग आजही मूलभूत गरजांसाठी वंचित आहे. खड्डे, रस्ते, पाणी, वीज टंचाई यावर मार्ग काढून आम्हाला चांगल्या सुविधा देणारे नेतृत्व आम्हाला हवे आहे. अजित गव्हाणे हे करू शकतात. त्यांच्याकडे कामाची दूरदृष्टी आहे. म्हणूनच त्यांच्या प्रचारासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. माझ्याप्रमाणे अनेक कार्यकर्ते आज या मतदारसंघात तुतारी फुंकण्याचे काम मोठ्या ताकदीने करणार आहेत.

…….

अजित गव्हाणे यांची प्रचारात आघाडी

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी मोशी परिसरामध्ये प्रचारात आघाडी घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे. गावठाण भाग आणि नव्याने विकसित होत असलेल्या हौसिंग सोसायटी यामुळे या भागाचे महत्व आहे.
माजी नगरसेवक लक्ष्मण सस्ते यांचा पाठिंबा मिळाल्याने गव्हाणे यांची या भागात ताकद वाढणार आहे. एकीकडे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना हा मोठा धक्का मानला जात असताना. मोशी परिसरात ”तुतारी’चा आवाज चांगलाच घुमणार असल्याचे बोलले जात आहे.