आमदार रविंद्र धंगेकर खासदार गिरीश बापट यांच्या भेटीला

0
253

पुणे, दि. ३ (पीसीबी) – शहरातील २००९ आणि २०१४ च्या कसबा विधानसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी गिरीश बापट यांना चांगलीच फाईट दिली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये आजवर अनेक वेळा आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले आहे. पण काल झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा पराभव केल्यानंतर त्यांनी मागील अनेक महिन्यांपासून आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे १० हजार ९४० मतांनी विजयी होत जायंट किलर ठरले असून, भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर धंगेकर यांनी काल केसरीवाडा येथील मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी जाऊन टिळक कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी शैलेश टिळक, कुणाल टिळक यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. तर आज भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांची आमदार त्यांनी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. तसेच यावेळी गिरीश बापट यांनी धंगेकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छादेखील दिल्या.