पुणे, दि. ४ (पीसीबी) – भाजप नेते गिरीश बापट यांचे निधन झाल्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघांची जागा रिक्त झाली आहे. आता या ठिकाणी पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाही. कारण त्यांच्या निधनानंतर अजूनही पोटनिवडणूक जाहीर झाली नाही. यामुळे भाजपने मिशन 2024 ची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी लोकसभा मतदार संघानुसार जबाबदारी निश्चित केली गेली आहे. या प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लांडगे यांच्याकडील शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाचा भार काढून घेण्यात आला आहे. विधानसभेत औरंगजेबाला लळा लावतो म्हणून अबू आझमी यांनी उच्चारवात सुनावणारे आमदार लांडगे एका दिवसात हिरो झाले होते, पण महिनाभरातच त्यांची शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी काढून घेतल्याने मोठी खळबळ आहे.
पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात समन्वयक भाजपकडून नेमले आहे. पुणे लोकसभा मतदार संघाची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिली होती. त्यानंतर शरद पवार यांचे वर्चस्व असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी राहुल कुल यांच्याकडे दिली. तसेच जून महिन्यात शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यांकडे दिली होती. परंतु आता शिरुरची जबाबदारी महेश लांडगे यांच्याकडून काढून घेतली आहे. आता ही जबाबदारी राजेश पांडे यांच्याकडे दिली आहे.
राजेश पांडे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून भाजपमध्ये आले आहेत. अभविपचे प्रदेशाध्यक्ष ते होते. त्यावेळी अभिविपचे संघटन त्यांनी मोठ्या कौशाल्याने सांभाळले होते. आता भाजपचे ते उपाध्यक्ष आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. पुणे विद्यापीठ आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राधिकरणावर त्यांनी काम केले आहे.
आमदार महेश लांडगे यांची जबाबदारी काढून घेण्यामागे राजकीय समिकऱण आहे. या लोकसभा मतदारसंघात सहा पैकी पाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून ते सर्वजण अजित पवार यांच्या गटात आहेत. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना अशी महाआघाडी असल्याने लांडगे यांच्याकडे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविल्याने राष्ट्रवादीचे सर्व आमदार नाराज होते. आगामी काळात या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून तीन वेळा खासदार राहिलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव तीव्र इच्छुकांच्या यादीत आहे. म्हणजेच भाजप बरोबर युतीत सरकार करणारे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवेसना शिंदे गटाची नाराजी ओढावली म्हणून लांडगे यांच्याकडील जबाबदारी काढूण घेण्यात आली, अशी चर्चा आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हेच उमेदवार असणार आहेत. त्यांचा पराभव करायचा तर भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना मिळून एकच उमेदवार पाहिजे. भाजपने आमदार महेश लांडगे यांना लढण्यासाठी तयार केल्याने अन्य घटक पक्षांनी अंग काढून घेतले होते. आता तीनही पक्षांत समन्वय साधणे शक्य असल्याचे सांगण्यात आले. आमदार लांडगे यांच्यावर ही कारवाई झाल्याने त्यांचे खासदार होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही हे मात्र खरे