आमदार महेश लांडगे यांची पाच कोटींची मटन पार्टी हिच का भाजपची संस्कृती , राष्ट्रवादीचा खडा सवाल

0
802

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) : सध्या आखाड पार्ट्या जोरात आहेत. त्यात भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी आपल्या मतदारसंघात काल (ता.१०) रात्री एकाच वेळी १३ ठिकाणी तब्बल एक लाख ३७ हजार जणांना ‘रेकॉर्ड ब्रेक’आखाड पार्टी दिली. चार टन मटण आणि दोन टन चिकन फस्त झाले. त्यावर आता ‘राष्ट्रवादी’चे पिंपरी-चिंचवड प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी आखाड पार्टीच्या माध्यमातून आमदार लांडगेंनी भाजपची नवी संस्कृती सुरू केली असल्याचा हल्लाबोल आज केला.
साध्या साध्या व्यवहारांची चौकशी करणारी ईडी एवढ्या मोठ्या जेवणावळीची चौकशी करणार आहे का? अशी विचारणा करीत वरपेनी लांडगेंना लक्ष्य केले. याची चौकशी होणार आहे का? की भाजपच्या लोकांना हे सर्व माफ असते, असा टोला त्यांनी लगावला. कालच्या आखाड पार्टीतून भाजपच्या नव्या संस्कृतीचा पायंडा आमदार लांडगेंनी पाडला. अशा पार्ट्यांसाठी इतका पैसा त्यांच्याकडे येतो कुठून ? की जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आहे, अशी विचारणा त्यांनी केली.

या माध्यमातून आमदार लांडगेंनी भाजपच्या नव्या संस्कृतीला सुरुवात केली आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकासाच्या पोकळ गप्पा मारतात आणि दुसरीकडे त्यांचेच आमदार लांडगे लोकांना मटन, चिकन, अंडी खाऊ घालतात. एवढा मोठा खर्च कशाच्या माध्यमातून केला जातो? एक साधा आमदार एक लाख ३७ हजार लोकांना कसे काय जेवण घालू शकतो ? त्याला ते कसे काय परवडते ? एवढा पैसा आला कुठून?अशा प्रश्नांची तोफ त्यांनी डागली.

पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी आणि कचराप्रश्न भेडसावत असून कोयता गँगच्या दहशतीमुळे कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झालेला आहे, असे असताना महेश लांडगे मात्र कार्यकर्त्यांना मटन, चिकन, अंडी खाऊ घालण्यात व्यस्त आहेत. मग, शहरातील नागरिकांच्या या समस्या कधी सुटणार? असा प्रश्नही रविकांत वरपेंनी विचारला.आखाड पार्ट्यांची भाजपची नवी संस्कृती उदयास आली आहे काय? असा टोलाही त्यांनी लगावला.