आमदार महेश लांडगेंना भाजप कार्यकारणीत ठेंगा, निष्ठावंतांना न्याय, गावकीला फाटा

0
678

पिंपरी चिंचवड शहर भाजपची जंबो कार्यकारणी शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप यांनी जाहीर केली. शहरात भाजपची सत्ता कायम ठेवायची आणि आगामी काळात सर्व सूत्रे ताब्यात ठेवायची म्हणून शंकरशेठने खूप लांबचा विचार केलाय. जुन्या नव्यांचा उचीत संगम असलेली तशी सर्वसमावेशक कार्यकारणी आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर अनेक अर्थांनी महत्वाची आहे. कार्यकारणीमधील एक एक नावाचा आढावा घेतला असता त्यातले बहुसंख्य पदाधिकारी हे जगताप यांचे खंदे समर्थक आहेत. भाजपच्या विधान परिषद आमदार उमाताई खापरे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनाही चांगला मान दिलेला दिसतो. मात्र, आमदार लांडगे यांना अक्षरशः ठेंगा दाखवलाय हेसुध्दा तितकेच खरे. शहराध्यक्षपदावर शंकर जगताप यांच्या नियुक्तीला जाहीरपणे विरोध करून घराणेशाहीचा ठपका ठेवणाऱ्या मुख्य पक्षप्रवक्ते अमोल थोरात यांना अपेक्षेप्रमाणे घरचा रस्ता दाखवला. थोरात यांची नियुक्ती करावीच लागेल अशा आमदार लांडगे आणि प्रदेशच्या दबावाला जगताप यांनी विनम्रपणे नकार दिला हे विशेष. त्यातून शंकरशेठचा खंबीरपणा दिसला. सर्व प्रश्नांवर समयोचित आणि संयतपणे उत्तर देणाऱ्या राजू दुर्गे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती यथार्थ वाटते. कार्यकारणीत एक मात्र कमी खटकली. सर्वच नावांची जंत्री वाचली तर त्यात स्वतःच्या बळावर मैदान मारतील अशा पदाधिकाऱ्यांची मागच्या तुलनेत थोडी कमतरता आहे. युवक, महिला, जात, भाषा, धर्मा असा समतोल राखला मात्र, प्रतिस्पर्ध्यांशी तोंड देताना धावणारे तगडे घोडे पाहिजेत ते दिसत नाहीत.

गावकीला पूर्णविराम दिला हे बरे केले…
शहराचे बदलते राजकारण पाहता किमान यापुढे गावकी-भावकी चालणार नाही याची जाण शंकरशेठ जगताप यांना आहे. शरद पवार यांच्यासारखे जुनीजाणते नेते त्यावर भाष्य करतात आणि आता बाहेरच्या मंडळींना त्या प्रमाणात प्रतिनिधीत्व दिले पाहिजे हे आपल्या समर्थकांना सांगतात. इथे भाजपमध्ये शंकरशेठने त्याची थेट अंमलबजावणी केली, याचा अर्थ मोठा आहे. सरचिटणीस पदावर पूर्वीचे आमदार लांडगे समर्थक विजय फुगे यांचा पत्ता कट करून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांना संधी दिली. मडिगेरी हे भाजपचे जुने कार्यकर्ते. सिमा सावळे, सारंग कामतेकर यांना विरोध केल्याने त्यांना पद मिळाले होते. आमदार लांडगे यांनी त्यांची हकालपट्टी केली म्हणून ते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वळचणीला गेले. कधीही महेश लांडगे यांचा फोटो न वापरणारे मडिगेरी यांनी आमदार जगताप यांचे निधनानंतर सरळ लांडगे यांच्यापुढे लोटांगण घातले. नंतरच्या काळात जाहीरातीत आमदार लांडगे यांचे फोटो टाकायला सुरवात केली. अशा मतलबी मंडळींपासून शंकरशेठला जपूण रहावे लागणार आहे.
आमदार महेश लांडगे यांनी दिवंगत आमदार जगताप यांच्यापासून स्वतःची वेगळी चूल कायम ठेवली होती. भाऊंच्या निधनानंतर पूर्ण भाजप आणि महापालिकेवर कब्जा मिळविला आणि जगताप समर्थकांना खड्यासारखे बाजुला केले होते. आता महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने पुन्हा अध्यक्षपदी स्वतःचीच वर्णी लागावी म्हणून आमदार लांडगे यांनी त्यांच्या चेल्यांमार्फत बराच आटापीटा केला. जगताप यांच्या घरात आमदारकी आहे मग अध्यक्षपद कशाला ही टूम लांडगे समर्थकांचीच होती. अशा आरोपांना भीक न घातला देवेंद्र फडणवीस यांनी शहराध्यक्षपद शंकरशेठ यांच्याकडे दिले आणि आमदार लांडगे यांनाही सुचक इशारा दिला. महापालिकेत आणि संघटनेते आमदार लांडगे यांनी गावकीचेच वर्चस्व कायम ठेवले म्हणून भाजपचा बहुजन मतदार दुखावला होता. तेच ओळखून शंकरशेठने गुंठामंत्री म्हणा की गाववाले काही अपवाद वगळता कार्यकारणीत घेणे टाळले. रवि देशपांडे यांच्या सारख्या आमदार उमा खापरे यांच्या समर्थकांना स्थान देऊन ब्राम्हण समाज जवळ केला. शहरात कामगार मतदार मोठा असल्याने या आघाडीची जबाबदारी नामदेव पवार या एकनाथ पवार समर्थकाकडे दिली आणि निष्ठावंतांना चुचकारले. एकाही आघाडीमध्ये आमदार महेश लांडगेंचा एकही माणूस घेतलेला नाही. गेल्या चार वर्षांत भ्रष्टाचारांच्या आरोपांनी भाजपची तुफान बदनामी झाली, आता ती प्रतिमा सुधारण्याचे काम शंकरशेठला करावे लागणार आहे. काल परवा चिखली ग्रामस्थांच्या सभेत माजी महापौर राहुल जाधव आणि भाजपच्या नगरसेवक तसेच आमदार लांडगे यांचा ज्या परखड शब्दांत उध्दार झाला तो बरेच काही सांगून जातो. पुढचे सहा महिने ही साफसफाई करावी लागेल. पुन्हा सत्ता आली तर त्याचे श्रेय एकट्या शंकरशेठचेच असेल आणि पराभव झालाच तर त्याचेही खापर शंकरशेठवरच असेल. असे काही होऊ नये म्हणून पक्षांतर्गत विरोधाकांच्या मुस्क्या बांधायचे काम आतापासूनच शंकरशेठला करावे लागणार आहे. पूढची तीन वर्षे कसोटीची असतील. त्यांचे थोरले भाऊ दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी हुकूमत गाजवली आणि एकाही विरोधकाला तोंड काढू दिले नाही. शंकरशेठ भाऊंचा वारसा चालवणार की चार पावले पुढे जाणार ते पहायचे. तुमचा महेश लांडगे होऊ देऊ नका, बस्स !!!