आमदार बनसोडेंवर जनता नाराजी, कोण सुलक्षणा शिलवंत ?

0
86
  • पिंपरी मतदारसंघात प्राधिकऱणवासी दाबणार नोटाचे बटन

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – पिंपरी राखीव मतदारसंघातील मतदार प्रचंड संभ्रमात असून बहुतांश मतदारांनी नोटा चा पर्याय निवडला आहे. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर तीव्र नाराजी असल्याने घड्याळ चिन्हावर शिक्का मारायला कोणी राजी होताना दिसत नाही. दुसरीकडे पर्याय म्हणून महाविकास आघाडीकडे पाहिले जाते पण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुलक्षण शिलवंत-धर यांचा कोणालाही परिचय नसल्याने तुतारी चिन्हाचे बटन का म्हणून दाबायचे, असा प्रश्न विचारला जातोय. विशेषतः आकुर्डी – निगडी प्राधिकरणातील उच्चभ्रू मतदारांनी तिसराच पर्याय निवडला असून आम्ही नोटा चे बटन दाबणार असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर अनेकांनी सांगितले.
चिंचवड मतदारसंघात भाजपचे शंकर जगताप यांच्या विरोधात आजवर तीन वेळा निवडणूक लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्यासह सर्वात जेष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या सारखा समर्थ पर्याय समोर आहे. भोसरी मतदारसंघातही भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचेच अजित गव्हाणे यांचे तगडे आव्हान असल्याने योग्य पर्याय मतदारांना मिळाला. पिंपरी राखीव मतदारसंघात तशी परिस्थिती नाही.
अजित पवार यांचे खंदे समर्थक अशी एकमेव ओळख असलेले आमदार अण्णा बनसोडे यांच्या विरोधात खुद्द राष्ट्रवादीच्या २७ माजी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. भाजपच्या माजी नगरसेवकांनीही आमदार बनसोडे उमेदवार असतील तर आम्ही प्रचार कऱणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते.
स्वतः आमदार बनसोडे हे मतदारांना कधीच उपलब्ध नसतात, त्यांचे कुठलेही ठोस काम नाही, विधीमंडळात एकही विषय त्यांनी कधी मांडलेला नाही अशा निष्क्रिय आमदाराला आम्ही १० वर्षे दिली आता पुन्हा का म्हणून निवडूण द्यायचे, असा रोखठोक सवाल मतदारांनी केला आहे. चिंचवड आणि भोसरीचे आमदार सतत कामात व्यग्र असतात तर, पिंपरीचे आमदार कायम अदृष्य असतात. कार्यकर्त्यांनाही ते उपलब्ध होत नसतात आणि राष्ट्रवादीच्या एकाही बैठक किंवा कार्यक्रमाला ते उपस्थित नसतात. सर्वात महत्वाचे म्हणजे निव्वळ झोपडपट्टीच्या मतदारांचे गणित मांडून ते जिंकतात आणि प्राधिकरणासारख्या अत्यंत महत्वाच्या परिसराकडे त्यांचे बिलकूल लक्ष नसते. प्राधिकऱणाच्या सर्व जमिनी फ्रिहोल्ड करण्याचा अत्यंत महत्वाच्या विषयावर लोक वारंवार मागणी करतात. आमदार बनसोडे यांनी कधी त्यावर भाष्य केलेले नाही. अशा अकार्यक्षम व्यक्तीलाच अजितदादा जाणीवपूर्वक पुन्हा उमेदवारी देत असतील तर आम्हालाही विचार करावाच लागेल, असा इशारा या मतदारांनी दिला आहे.
महाविकास आघाडी याच संधीचा फायदा घेऊन एखादी कार्यक्षम व्यक्ती पर्याय म्हणून रिंगणात उतरवेल अशी अपेक्षा होती. स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष आणि अत्यंत अभ्यासू, कार्यक्षम, आक्रमक कार्यशैली असलेल्या सिमाताई सावळे यांचे नाव पर्याय म्हणून होते. निष्क्रिय आमदाराचा पराभव करायचाच तर सिमाताई यानाच उमेदवारी द्यायला पाहिजे होती. तीन वेळा नगरसेवक आणि भाजप सत्ता काळात स्थायी समिती अध्यक्ष असताना रेकॉर्डब्रेक ५००० कोटींची कामे करून त्यांनी आपली कार्यक्षमता दाखवून दिली होती. महापलिकेतील भ्रष्टाचाऱ्यांचा कर्दनकाळ अशी त्यांची ओळख होती. कायम प्रकाश झोतात असल्याने मतदारंना हे नाव सुपरिचित होते. इतकेच नाही तर त्याच आमदार बनसोडे यांचा पराभव करू शकतील, अशी आम्हाला पूर्ण खात्री होती. अशा परिस्थितीत एकदा नगरसेवक म्हणून जिंकलेल्या सुलक्षणा शिलवंत-धर यांना उमेदवारी दिल्याने आम्हाला तिसरा नोटा चा पर्याय निवडावा लागत आहे, असे अत्यंत प्रभावी आणि जेष्ठ मतदारांनी चर्चेत सांगितले.