आमदार पी. एन. पाटील यांचं निधन

0
101

दि २३ मे (पीसीबी ) – काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांचं निधन झालं. पहाटे खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गांधी घराण्याचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचेही खंदे समर्थक म्हणून पाटील ओळखले जात होते. रविवारी राहत्या घरातल्या बाथरुममध्ये ते पाय घसरुन पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.विजय वडेट्टीवार यांनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे. तसंच त्यांना आदरांजलीही वाहिली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली खंत
कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आधारवड, विधिमंडळातील माझे सहकारी आमदार पी एन पाटील यांच्या निधनाने वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे आक्रमक आणि निष्ठावान नेतृत्व आज आम्ही गमावले आहे. पी एन पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखातून सावरण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला आणि मित्र परिवाराला बळ मिळो हीच ईश्वचरणी प्रार्थना.

जनतेशी घट्ट नाळ जुळलेला कर्तव्यनिष्ठ लोकसेवक हरपला

  • उपमुख्यमंत्री अजित पवार

“कोल्हापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे आमदार पी एन पाटील यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. कोल्हापूरच्या जनतेशी एकरुप झालेलं नेतृत्व, धडाडीचे लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं नेतृत्व आपण गमावले आहे. कोल्हापूरच्या सामाजिक, राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. दिवंगत पी एन पाटील यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.