पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये प्रत्येक महिन्याच्या शेवटी प्लास्टिक संकलन अभियानाचे मागील दोन वर्षापासून यशस्वी आयोजन करत पर्यावरण रक्षणाला हातभार लावत असल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री व विद्यमान विधान परिषद सदस्य आ. एकनाथजी खडसे यांनी महाविद्यालयाचे विशेष कौतुक केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व गोल्डमॅन मा. प्रशांत सपकाळ यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आयोजित प्लास्टिक संकलन अभियानाच्या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मा. प्रशांत सपकाळ, माजी स्थायी समिती सभापती मा. प्रशांत शितोळे, मा. शामभाऊ जगताप, मा. शिवाजी पाडोळे, मा. गणेश जगताप आदी मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी व प्लास्टिकच्या वापराबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी या अभियानाचे आयोजन केले असल्याचे नमूद करत महाविद्यालयातर्फे आयोजित विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली.
या अभियानांतर्गत प्रभाग व नवी सांगवी परिसरात प्रशांत सपकाळ यांनी पुढाकार घेत आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये प्लास्टिक संकलनाची सोय केली होती. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी १७ ते १९ जुलै या कालावधीमध्ये प्लास्टिक पिशव्या, ब्रश, कंगवे, प्लास्टिकची खेळणी, औषधाच्या बाटल्या, अन्नाचे रिकामे कंटेनर, पाण्याच्या बाटल्या, बादली, तेलाचे कॅन, दुधाच्या स्वच्छ पिशव्या जनसंपर्क कार्यालयामध्ये ठेवलेल्या बॉक्सेसमध्ये जमा केलेल्या असून पुढील प्रक्रियेसाठी महाविद्यालयामार्फत तो कचरा सागरमित्र या स्वयंसेवी संस्थेकडे जमा करण्यात येणार आहे.या अभियानाच्या यशस्वितेसाठी प्लास्टिक संकलन अभियानाच्या समन्वयक डॉ. राणी भगत, प्रा. सोनल कदम, प्रा. माधुरी चौधरी, प्रा. सद्दाम हुसेन घाटवाले, रामदास चिंचवडे, प्रणित पावले यांनी परिश्रम घेतले.