आमदार उमा खापरे यांची पिंपरी विधानसभा प्रभारी पदी नियुक्ती

0
285

पिंपरी,दि.११(पीसीबी) – विधान परिषद आमदार उमा खापरे यांची महाविजय २०२४ साठी पिंपरी विधानसभा प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार उमा खापरे यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप जोरदार कामाला लागला आहे. केंद्रात पुन्हा स्वबळावर भाजपचे सरकार आणण्यासाठी राज्यातून अधिकाधिक खासदार निवडून आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील ४८पैकी ४५ जागांवर विजयाचा संकल्प करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत उमा खापरे या दोन वेळा नगसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत. १९९७-२००२ या कालावधीत त्यांनी नगरसेविका म्हणून महापालिकेत काम केले आहे. उमा खापरे या गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ भाजपसोबत काम करत आहेत. तसेच त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षनेत्या म्हणूनही काम केलेले आहे. भाजपच्या पुणे जिल्हा सरचिटणीस, महिला मोर्चा पदाधिकारी, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्षा, महिला प्रदेशाध्यक्षा अशी विविध आणि महत्वाची पदेही त्यांनी भूषविली आहेत. आता त्या विधानपरिषदेत आमदार म्हणून काम करणार आहेत.

आमदार उमा खापरे म्हणाल्या की, ‘भाजप ३६५ दिवस निवडणुकीची तयारी करणारा पक्ष आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘महाविजय २०२४’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत पक्षाने आपली रणनीती आखली आहे. त्यानुसार राज्यभरात विधानसभेच्या २८८ आणि राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ मतदारसंघांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. या माध्यमातून केंद्रातील मोदी सरकार आणि राज्य सरकारची कामे लोकांपर्यंत प्रत्येक मतदारसंघ आणि प्रत्येक मतदारसंघातील समस्या आणि विषयांची माहितीही या माध्यमातून घेणार आहे. भाजपने निवडणूक व्यवस्थापनामध्ये एक वैशिष्ट्य तयार केले आहे. त्यामुळे भाजप २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदारसंघांत तयारी करीत असून पक्षाने प्रभारी पदाची जबाबदारी सोपविली आहे.