आमदार आपल्या दारी’ उपक्रमाद्वारे नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर – शंकर जगताप

0
13

चिंचवड, दि .२३ पीसीब – “नागरिकांच्या समस्या सोडवणे ही आमची जबाबदारी असून, ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमाद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय साधून समस्यांचे निराकरण करण्यावर आमचा भर राहील.” असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १६, १७ आणि १८ मधील नागरिकांसाठी “आमदार आपल्या दारी – संवाद | सेवा | समर्पण” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शनिवार, २२ रोजी सकाळी चिंचवडे लॉन्स, बिर्ला हॉस्पिटल जवळ, चिंचवडगाव येथे संपन्न झाला. या वेळी आमदार शंकर जगताप यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि तातडीने सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.

या कार्यक्रमास माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राजेंद्र गावडे, अभिषेक बारणे, सुरेश भोईर, बाळासाहेब ओव्हाळ, मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, अश्विनी चिंचवडे, संगीता भोंडवे, करुणा चिंचवडे, मोरेश्वर शेडगे, अजित कुलथे, बिभीषण चौधरी, विठ्ठल भोईर,सचिन राऊत, महिला मोर्चा मंडल अध्यक्षा पल्लवी वाल्हेकर, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, योगेश चिंचवडे, कविता दळवी, अमृता नवले, दीपक भोंडवे, धर्मपाल तंतरपाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

नागरिकांच्या समस्या आणि तातडीचे निराकरण

या उपक्रमात नागरिकांनी विविध विभागांशी संबंधित तक्रारी मांडल्या. यामध्ये अतिक्रमण, रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, वीजपुरवठा समस्या, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधांशी संबंधित अडचणींचा समावेश होता. नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी महानगरपालिका, महावितरण, पाणीपुरवठा विभाग आणि इतर शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

K-विला सोसायटीच्या नागरिकांनी कचरा डेपो संदर्भात तक्रार नोंदवली, ज्यामुळे जवळपास 1000-2000 कुटुंबांवर परिणाम होत होता. या तक्रारीची तातडीने दखल घेत महापालिका अधिकाऱ्यांना हा डेपो स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, रेशन कार्ड संदर्भात ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती मदत करण्यास सांगण्यात आले.

शासकीय योजनांची माहिती आणि मदत

कार्यक्रमादरम्यान नागरिकांना उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, वयाचा दाखला, रेशन कार्ड अर्ज आणि दुरुस्ती यांसाठी मदत करण्यात आली. तसेच, सरकारी योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या उपक्रमास जवळपास दोन ते अडीच हजार नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांनी थेट आमदार आणि अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्या मांडल्या. अनेक समस्यांचे त्वरित निराकरण करण्यात आले, तर काही समस्यांवर लवकरच कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही आमदार शंकर जगताप यांनी दिली. त्यांनी नमूद केले की, “संवाद, सेवा, समर्पण हा भाव ठेवून हा उपक्रम राबवला जात आहे. नागरिकांचा प्रतिसाद पाहून जनसेवेचा माझा उत्साह अधिक वाढला आहे.”

या कार्यक्रमास महापालिका आणि इतर शासकीय विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमामुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्यास मदत झाली असून, हा उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवला जाईल, असे आमदार शंकर जगताप यांनी स्पष्ट केले.