आमदार अपात्रतेच्या निर्णयावर राहुल नार्वेकर यांनी बोलावली तातडिची बैठक

0
203

मुंबई, दि. २४ (पीसीबी) : आमदार अपात्रेसंदर्भात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधीमंडळ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलवली आहे. आमदार अपात्रतेसंदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेसंदर्भातील हालचालींनी वेग आल्याचे दिसत आहे.

गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने “दोन आठवड्यात लिखित उत्तर सादर करा, अशी नोटीस अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पाठवली होती. अपात्रतेच्या निर्णयाला उशीर का होत आहे, या असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नोटीशीत उपस्थित केला. यासोबतच दोन आठवड्यात लिखित उत्तर देण्याच्या सूचनाही न्यायालयाने दिल्या होत्या. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रक्रिया कशी सुरु आहे याबद्दलची सविस्तर माहिती द्यावी असंही सुप्रीम कोर्टाने नोटीसमध्ये म्हटलं आहे.

त्यानंतर, राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्रतेविषयी नोटीस पाठवत आपली बाजू मांडण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर दोन्ही गटापैकी ठाकरे गटाच्या १४ आमदारांनी २६२ पानी लेखी उत्तर नार्वेकरांकडे सादर केले. दोन्ही पक्षांच्या आमदारांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांकडे दिली. शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करुन आपण यावर निर्णय घेऊ, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं. शिंदे-ठाकरे गटाच्या प्रतोदांनी परस्परविरोधी गटातील आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या नोटिशीला शिवसेना ठाकरे गटाचा ठेंगा; उत्तर ने दण्याची भूमिका..
एकनाथ शिंदे गटाच्या चाळीस आमदारांनाही अध्यक्षांनी नोटीस पाठवली होती. त्यांची अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. यापूर्वीच शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी बाजू मांडण्यासाठी मुदत वाढवून मागितली. मुदत संपल्यानंतर आता शिंदे गट कधी व काय बाजू मांडतो याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.