आमदार अपात्रतेची सुनावणी, पुन्हा तारिख पे तारिख

0
183

मुंबई , दि. ६ (पीसीबी) – शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र की अपात्र, याबाबत सुप्रीम कोर्टात येत्या ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्र प्रकरणात वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेताना कोर्टाने अध्यक्षांना फटकारलं होतं.

इतकंच नाही, तर विधानसभा अध्यक्षांनी दोन आठवड्यात आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीचा रोडमॅप सादर करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने दिल्या होत्या. यावर ६ ऑक्टोबरला सुनावणी घेतली जाईल, असं कोर्टाकडून सांगण्यात आलं होतं. त्यानुसार अध्यक्षांनी आमदारांची एक सुनावणी घेत पुढील वेळापत्रकही तयार केले.

६ ऑक्टोबरच्या सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीचा रोडमॅप सादर करणार होते. मात्र, आता कोर्टाने ही सुनावणी पुढे ढकलली असल्याची माहिती आहे. प्रकरण लिस्टेड न झाल्याने ही सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आमदार अपात्रतेप्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याने ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांकडून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाला सुनावणीचे पुढील वेळापत्रक ईमेल द्वारे पाठवण्यात आला आहे. अध्यक्षांकडून मिळालेल्या वेळापत्रकानुसार दोन्ही गटांचे आमदार आणि बाजू मांडणारे वकील हे आता पुढील रणनीती ठरवणार आहे.