आमदार अण्णा बनसोडे यांची तिरपी चाल… | थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
645

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कालचा (१६ जून) पिंपरी चिंचवड दौरा खऱ्या अर्थाने चर्चेत आला तो वेगळ्याच कारणाने. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने खरे तर, खासदार श्रीरंग बारणे यांनी एकप्रकारे स्वतःच्या प्रचाराचा नाराळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फोडला. महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे अनावरण करून शहरातील लाखभर लिंगायत बांधवांची स्वप्नपूर्ती केली. हे दोन शासकीय कार्यक्रम सोडले तर, मुख्यमंत्री शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अण्णा बनसोडे यांच्या काळभोरनगर येथील कार्यालयाला भेट ही अनेक अर्थाने महत्वाची मानली जाते. पुढच्या राजकारणाची ती नांदी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दादा अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून आमदार बनसोडे यांची खास ओळख. सलग तीन वेळा नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष, पिंपरी राखीव मतदारसंघातून २००९ आणि नंतर २०१९ असे दोनवेळा आमदार असलेले बनसोडे हे तसे जुने प्रस्थ. आझमभाई पानसरे यांचे बोट धरून ते राजकारणात आले, पण नंतर ते भाईंचेही नाही राहिले. चिंचवड स्टेशनचा पानपट्टीवाला अण्णा ते आमदार अण्णा, असा हा ३० वर्षांचा राजकीय प्रवास. आता तो पुढे सुरू राहणार की नाही याबाबत कोणालाच शाश्वती देता येत नाही. बनसोडे यांचे गलबत सद्या राष्ट्रवादीच्या बंदरावर आहे, पण उद्या ते इथे असेल याबाबत अजित पवारसुध्दा सांगू शकत नाहीत. आताच्या राजकीय वादळात आमदार बनसोडे यांची नौका जोरजोरात हेलकावे खात आहे. आता ती खडकावर आदळून फुटणार की दुसऱ्या म्हणजे शिंदे यांच्या ठाणे बंदरावर लागणार ते पहायचे.

यापूर्वीचा इतिहास पाहिला तर शहराच्या राजकारणात नशिबाची साथ मिळाल्याने गजानन बाबर आणि विलास लांडे हे दोनवेळा आमदार झाले, मात्र तिसऱ्यांदा लोकांनी त्यांना साफ नाकारले. भोसरीचे दमदार आमदार महेश लांडगे हेसुध्दा दोनदा आमदार झाले, आता हॅट्रीक करण्याच्या तयारीत ते आहेत. बनसोडे यांनी दोन पंचवार्षिकमध्ये काय काम केले, ते ना त्यांना सांगता येते आणि ना राष्ट्रवादीला. आलटून पालटून दोन्ही पंचवार्षीकमध्ये काम दिसले नाही म्हणून तिसऱ्यांदा जनता त्यांना स्वीकारणार नाही, असे खासगी चर्चेतील अंदाजही सांगतात. भोसरी आणि चिंचवडमध्ये भाजप नगरसेवकांची संख्या मोठी आहे, मात्र पिंपरी राखीव मधून सर्वाधिक नगरसवेक राष्ट्रवादीचे आहेत. दुर्दैवाने राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवक हे बनसोडे यांच्यावर नाराज आहेत. राष्ट्रवादीच्या कुठल्याही बैठकित, आंदोलनात किंवा महत्वाच्या कार्यक्रमात आपले आमदार दिसत नसल्याने पक्षाचे पदाधिकारीसुध्दा बनसोडे यांच्याविषयी नकारात्मक बोलतात. महाआघाडीचे सरकार पडले तेव्हासुध्दा बनसोडे यांची भूमिका संभ्रम निर्माण करणारी होती. कचरा ठेकेदाराला मारहाण, गोळीबार प्रकऱणातसुध्दा राष्ट्रवादी नाहक बदानाम झाली.

महापालिकेत भाजपच्या भ्रष्टाचाराची शेकडो प्रकऱणे असताना त्यावर आमदारांनी चकार शब्द केला नाही. शहरात विरोधक म्हणून राष्ट्रवादीला जी तादक द्यायला पाहिजे ती आमदार बनसोडे यांच्याकडून कधीच मिळालेली नाही म्हणून संघटनेत नाराजी होती. अशा सर्व परिस्थितीत पुन्हा राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली तरी पराभवच पदरी पडेल की काय अशी शंका बनसोडे यांना आहे. जागा राखायची म्हणून स्वतः अजित पवार यांनी कायम चर्चेत असणारे काही तगडे उमेदवार शोधून ठेवलेत, अशीही धास्ती बनसोडे यांच्या मनात आहे. तसे झालेच तर आपली डाळ शिजणार नाही हे ओळखून बनसोडे यांनी ही तिरकी चाल केली आसावी. दोनदा आमदार होऊनही राष्ट्रवादीकडून पदरात काहीच पडले नाही, मात्र शिंदे गटातून किमान राज्यमंत्रीपद किंवा एखादे महामंडळ मिळेल, अशीही भाबडी अपेक्षा बनसोडे यांना असावी. त्याशिवाय आजवरच्या तीनही निवडणुकांचे मतदान पाहिले आणि भाजप, शिवसेना आणि रिपाई अशा संयुक्त मतांची गोळाबेरीज केली तर परिक्षा सोपी वाटत असावी. युतीच्या किमान ७५ ते ९० हजार मतांची बेगमी बिनखर्चात आणि बिनबोभाट होत असल्याचे दिसते. शिवाय भोसरीतून महेश लांडगे, चिंचवडमधून अश्विनी जगताप किंवा जगताप कुटुंबापैकी शंकर जगताप असे भाजपचे उमेदवार बरोबर असतील तर पिंपरीसह तीन मतदारसंघाचे मिळून जे एकत्रीत वातावरण होईल त्याचाही मोठा फायदा शक्य होईल, असेही बनसोडे व समर्थकांचे एक गणित आहे. बनसोडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा शिंदे गट शिवसेनेची उमेदवारी अधिक फायद्याची होऊ शकते. म्हणजे प्रश्न राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारण्याचा नाही तर बनसोडे यांनाच राष्ट्रवादी उमेदवारी ही जोखिम वाटते की काय अशी शंका येते.
आता या सगळ्या शक्यता गृहीत धरून बनसोडे यांनी स्वतःची जागा राखण्यासाठी ही चाचपणी सुरू केली आहे. म्हणूनच मुख्यमंत्री शिंदे यांना बनसोडे यांनी जाणीवपूर्वक आपल्या कार्यालयात निमंत्रीत केले. त्यातून त्यांनी आपल्या पक्षालाही सूचक इशारा दिला. वेळ प्रसंगी मी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करेल, असाही सांगावा त्यांनी आपल्या कृतीतून दिला.

शिंदे यांच्या भेटीचा दुसरा राजकीय अर्थसुध्दा तितकाच महत्वाचा आहे. शिवसेना भाजपच्या जागावाटपात शहरातील चिंचवड आणि भोसरी हे दोन मतदारसंघ भाजपकडे कायम आहेत. तिसरा राखीव मतदारसंघ पिंपरी हा शिवसेनेकडे आहे.
भाजपने येथून सुरवातीला अमर साबळे यांनी संधी दिली, पण तिथे राष्ट्रवादीचे बनसोडे जिंकले. नंतर रिपाईच्या चंद्रकांता सोनकांबळे यांना युतीच्या उमेदवार म्हणून संधी दिली, मात्र त्यांनी कमळ चिन्ह नाकारले आणि शिलाई मशिन चिन्ह घेतल्याने त्यांचा परभाव झाला. ठाकरेंच्या शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार हे २०१४ मध्ये आयत्यावेळी काँग्रेसमधून शिवसेनेत आले आणि आमदार झाले. २०१९ मध्ये राष्ट्रवादीने सुलक्षणा शिलवंत या महिला नगरसेविकेला संधी दिली होती. आयत्यावेळी उमेदवारी बदलून तिथे पुन्हा बनसोडे यांचीच उमेदवारी जाहीर केली. शिवसेना आमदार चाबुकस्वार यांचा बनसोडे यांनी पराभव केला आणि दुसऱ्यांदा आमदार झाले. दरम्यान, गेल्या साडेतीन वर्षांत शिवसेना फुटली आणि शिंदे गट निर्माण झाला. दुसरीकडे तोडिस तोड महाआघाडीची मोट शरद पवार यांनी बांधली. आता लोकसभा अगोदर होणार की महापालिका निवडणूक त्याचा अंदाज नाही. पुढे विधानसभा आहेच. यापुढच्या सर्व निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय शिंदे आणि फडणवीस यांनी दोनवेळा जाहीर केला. त्यानुसार युतीच्या जागावाटपात पिंपरी राखीव ची जागा शिंदे गटाला मिळाली पाहिजे. शहरात किमान एक जागा शिंदे गटाला मिळावी म्हणून स्वतः खासदार बारणे आणि मुख्यमंत्री शिंदे यांची आग्रही भूमिका आहे. आता ते फक्त पिंपरी राखीव मतदारसंघासाठी शक्य आहे. बनसोडे यांनी जसा राष्ट्रवादीवर दबाव टाकण्यासाठी शिंदे यांच्या भेटीचा खटाटोप केला तसाच या जागेसाठी आमचाच हक्क आहे हे भाजपला दाखविण्यासाठी शिंदे यांनी हा खेळ केल्याचे सांगण्यात येते. मुख्यमंत्र्यांच्य नथीतून आमदार बनसोडे यांनी तिरंदाजी केली आहे.