आमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला

0
397

– आपले खासदारही विरोधात गेल्याने ठाकरे याची मोठी कोंडी

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) : शिवसेनेतील आमदारांचे बंड आता खासदारपर्यंत पोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला तीन खासदारांनी दांडी मारली. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचा समावेश आहे. तसेच शिवसेनेचे तब्बल ११ खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्याने केला आहे. त्यामुळे आमदारांपाठोपाठ खासदारांमध्येही फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बैठकीतील बहुतांश खासदारांनी एकनाथ शिंदेंशी जुळवून घेत भाजपबरोबर युती करावी, असे मत मांडले. दरम्यान, मोदी यांच्या मंत्रीमंडळात श्रीकांत शिंदे यांचा समावेश होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री शिवसेनेच्या खासदारांची ‘मातोश्री’वर बैठक झाली झाली. ईडीकडून चौकशी सुरू असल्याने संजय राऊत या बैठकीला उपस्थित नव्हते. याशिवाय, भावनी गवळी, श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे हे तीन खासदार बैठकीस अनुपस्थित होते. यातील विचारे हे केदारनाथला गेल्याचे सांगण्यात आले. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असल्याने ते गैरहजर राहणे साहजिक आहे. मात्र, गवळी आणि विचारे यांच्या दांडीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. गवळी यांनीही भाजपशी जुळवून घ्यावे, असे यापूर्वीच सांगितले होते. त्यांनाही ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलेले आहे.

दरम्यान, बैठकीतील बहुतांश खासदारांनी एकनाथ शिंदे गटाशी जुळवून घ्यावे. तसेच, शिवसेना-भाजप युतीचा विचार करावी, अशी विनंती केली. यामध्ये ज्येष्ठ खासदार गजानन कीर्तिकर हेही सामील होत, असे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ११ खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचे एका केंद्रीय मंत्र्याने सांगितले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचे खासदार मतदान करतील, असेही भाजपकडून बोलले जात आहे.

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक : आघाडीचा उमेदवार ठरला ; नार्वेकर विरुद्ध साळवी सामना रंगणार
यासंदर्भात लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत म्हणाले की, शिवसेनेच्या संसदीय पक्षावर राज्यातील घडामोडींचा काहीही परिणाम होणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी पक्षाचे सर्वच खासदार एकजुटीने उभे आहेत.

आमदारांच्या पाठोपाठ खासदारसुध्दा आता भाजपा बरोबर युतीचा आग्रह धरत असल्याने उध्दव ठाकरे यांची कोंडी झाली आहे. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकित या पैकी बहुसंख्य खासदार हे भाजपाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी यांच्यामुळे दोन वेळा (२०१४ व २०१९ ) खासदार झालेल्या खासदारांना स्वतःच्या बळावर विजयी होण्याची शाश्वती नसल्याने मोदी यांच्या बरोबर जायला पाहिजे असे सर्वांचे मत पडले आहे.