आमच्या हातातील ‘मशाल’ विरोधकांना भस्म करेल – बबनदादा पाटील

0
141
  • पनवेल विधानसभेत संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ गावभेट दौरा
  • महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग

दि ३० एप्रिल (पीसीबी ) पनवेल :- कुठलेही युद्ध जिंकायचे असेल, तर आपल्या हातात कुठले शस्त्र आहे. त्याची ताकद ओळखून त्या युद्धात उतरावे लागते. आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी आमच्या हातात “मशाल” हे‌ शस्त्र दिले आहे. स्वाभीमान, निष्ठा आणि क्रांतीचे प्रतिक असलेली हीच “मशाल” विरोधकांना भस्म केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी विरोधकांवर तोफ डागली.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील पनवेल विधानसभेत गावभेट दौरा करत बैठका घेत आहेत. गावा गावात मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले जात आहे. या दरम्यान झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या दौ-यात त्यांच्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शिरीष घरत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विशेष प्रतिनिधी आर. सी. घरत, पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, पनवेल तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, तालुका अध्यक्ष विश्वास पेटकर यांच्यासह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नं

पनवेल विधानसभा मतदारसंघातील चीपळे गावापासून प्रचार बैठकांना प्रारंभ करण्यात आला. भोकरपाडा, बोनशेत, विहिघर, नेरे, वाजे, शिवणसई, दुंदरे, चींचवली, रीटघर, धामणी, धोदानी, आंबिवली, वांगणी, पाली, मोहो, शिवकर, उसर्ली, विचुंबे, देवद येथे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचे महिलांनी औक्षण करीत मोठ्या उत्साहात स्वागत केले.

यावेळी संजोग वाघेरेंना मिळणारा प्रतिसाद प्रस्थापितांच्या ऊरात धडक्या भरवणारा असल्याचे सांगताना शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील म्हणाले की, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट, तसेच मित्र पक्ष समन्वय साधत प्रचार यंत्रणा. राबवत आहे. संजोग वाघेरे पाटील यांना आघाडी मिळवून देण्यासाठी आम्ही सारे रात्रंदिवस काम करत आहोत. आमची निशाणी मशाल मनामनात रुजवण्यासाठी आम्ही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहोत.

दहा वर्षे सामान्यांच्या प्रश्नांकडे खासदारांची डोळेझाक: संजोग वाघेरे
या निमित्ताने उमेदवार संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, नैना प्रकल्प, बहुउद्देशीय कॉरिडोर, मुंबई ऊर्जा मार्ग या प्रकल्पांच्या जमीन भूसंपादनाच्या विषयांमध्ये येथील स्थानिक भूमिपुत्र आणि शेतकरी असमाधान व्यक्त करीत आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे गेल्या दहा वर्षात खासदारांनी डोळेझाक केली. याला न्याय अधिकार प्राप्त करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. शेतकरी व भूमिपुत्रांना न्याय देण्याची भूमिका घेवून आणि या भागातील प्रश्न तडीस नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असे ते म्हणाले.