आमच्याकडे रागाने का बघतोस, असे म्हणत टोळक्याने मारहाण केली; झोपडी पेटवली !

0
88

चिंचवड, दि. 18 (पीसीबी) : आमच्याकडे रागाने का बघतोस, असे म्हणत टोळक्याने तरुणाला मारहाण केली. तसेच त्याची झोपडी पेटवली. आगीत झोपडी खाक झाली. चिंचवड येथे सुदर्शन नगर जवळ रेल्वे मार्गालगत गुरुवारी (दि. १७) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

विजय विष्णू कसबे (३५, रा. आनंदनगर, चिंचवड) असे मारहाण झालेल्याचे नाव आहे. चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय कसबे यांची सुदर्शन नगरजवळ रेल्वे मार्गालगत ताडपत्रीची तंबू वजा झोपडी आहे. तेथे ते कोंबड्या ठेवतात. गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास विजय कसबे कोंबड्या ठेवण्यासाठी गेले. त्यावेळी तेथे अनोळखी चार जण थांबले होते. आमच्याकडे रागाने का बघतोस, असे अनोळखी व्यक्ती म्हणाली. मी तुमच्याकडे बघत नाही, असे विजय कसबे म्हणाले. त्यामुळे टोळक्यातल्या एका अनोळखीने त्यांना मारहाण केली. त्यावेळी विजय तेथून पळून गेले. जाताना रेल्वे मार्गालगत असलेले दोन दगड टोळक्यावर भिरकावले. विजय कसबे हाती लागले नाही म्हणून टोळक्याने त्यांची झोपडी पेटवली. याबाबत माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत जीवित हानी किंवा कोणालाही दुखापत झाली नाही. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.