आभाळ फाटलंय, जमीन वाहून गेली आहे, पण सरकार क्रिकेट मॅचच्या बंदोबस्ताला लागलं…

0
21
xr:d:DAFosSnTaio:8,j:5619763045875469870,t:23071515

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. ज्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक, पुणे घाट माथा, रायगड, धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली.

नुकतंच खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. हा संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील पूरग्रस्त परिस्थिती आणि सरकारच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. आभाळ फाटलंय, जमीन वाहून गेली आहे. अशावेळी पूर्ण मदत ही सरकारकडून व्हायला हवी. पण सरकार क्रिकेट मॅचच्या बंदोबस्ताला लागलं आहे. लोकांना अन्न-पाणी मिळालेले नाही. त्यापेक्षा सरकारने पूरग्रस्त जिल्ह्यात राहून मदतकार्याचा आढावा घ्यावा, असा सल्ला संजय राऊतांनी दिला.

मराठवाडा, अहिल्यानगर, बीड या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकणातही पाऊस सुरु आहे. तुमच्याकडे शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी काय योजना आहेत? गमबूट घालून चार तास एक दौरा केलात आणि परत आलात. तुमचे त्या त्या भागाचे पालकमंत्री कुठे आहेत? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.

धाराशिवचे पालकमंत्री एकदा दोन टेम्पो घेऊन गेले, फोटो लावून गेले. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांनी ठाण मांडून बसण्याची गरज असताना, ते मुंबईत काय करत आहेत, असा प्रश्न संजय राऊत यांनी केला. तसेच या मंत्र्यांना बडतर्फ करा, हा सामाजिक राजकीय गुन्हा आहे. अमानुष आहे, अशा तीव्र शब्दांत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

तुम्ही पुढच्या वर्षी दांडिया करा. तुम्ही शेतकऱ्यांना काय मदत केली, हे मला दाखवा. आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या संपर्कात आहोत. तुम्ही काय मदत केली हे दाखवा. तुमची कोणती मदत पोहोचली हे दाखवा. आम्हाला काय विचारताय, तुम्ही काय केलं म्हणून. सरकार तुमचं आहे. भो*** सरकार आमचं आहे का, आम्हाला कसले प्रश्न विचारताय, ही हरामखोर लोक आहेत. सत्ता कोणाची आहे? सरकार कोणाचं आहे? तिजोरी कोणाच्या हातात आहे? निर्लज्जपणाचा कळस आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले.