आप स्वबळावर लढणार,एक्स पोस्ट अरविंद केजरीवाल

0
7

मुंबई, दि. ११ – दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलं आहे. खरं तर इंडिया आघाडीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची आघाडी होऊन दिल्लीची निवडणूक एकत्रित लढली जाईल अशी चर्चा असताना ‘आप’ने स्वबळाचा नारा दिल्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा आगामी मुंबई महापालिका निवडणूक आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील त्रांगडे परवडणारे नसल्याने शिवसेना ठाकरे गटाचाही स्वतंत्र लढण्याचा होरा आहे.

दिल्लीत आपली सत्ता असलेल्या आम आदमी पार्टीने इंडिया आघाडीत असून सुद्धा आपली ताकद पाहून काँग्रेससोबत आघाडी न करता स्वबळाचा नारा दिला आहे. पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आम आदमी पार्टीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची ठरवली आहे. त्यासाठी आपण कुठल्याही प्रकारे कोणासोबत आघाडी करणार नसल्याचं अरविंद केजरीवाल यांनी आपल्या एक्स मधील पोस्ट वरून सांगितलं आहे.

काँग्रेसचा आत्मविश्वास विधानसभा निवडणुकीत नडला
आता हाच विचार आगामी मुंबई महापालिकासह महाराष्ट्र इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने केल्यास त्यात नवल वाटायला नको. कारण महाविकास आघाडीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी अशा प्रकारचा काही पदाधिकाऱ्यांचा आणि माजी नगरसेवकांचा सूर असल्याचं मागे झालेल्या काही बैठकांमधून समोर आलं. तर पराभूत उमेदवारांनी सुद्धा उद्धव ठाकरेंसमोर स्वबळाची भूमिका भविष्यातील पक्षाच्या रणनीतीसाठी समोर मांडली. इतकंच काय तर विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा खापर काँग्रेसवर फोडत काँग्रेसचा आत्मविश्वास विधानसभा निवडणुकीत नडला असं ठाकरेंच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं.

मुंबई महापालिकेत मागील पंचवीस वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुद्धा मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेने तीन खासदार आणि दहा आमदार निवडून आणले त्यामुळे पक्षाची मुंबईत ताकद अजून सुद्धा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मुंबई महापालिकेची निवडणूक न लढता “आप”सारखा मुंबईच्या महापालिका निवडणुकीत सुद्धा स्वबळाचा नारा ठाकरेंच्या शिवसेनेकडून दिला जाऊ शकतो.मात्र याबाबत अद्याप कुठलाही निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतलेला नाही. याबाबत चाचपणी करून आणि कार्यकर्ता पदाधिकारी आणि स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यातील असं सांगण्यात येतंय. तर हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने या बीएमसी निवडणुकीत तळागाळात पोहोचवण्याची तयारी ठाकरेंच्या शिवसेनेने केली असल्यामुळे समाजवादी पक्षाप्रमाणे मविआतील इतर दोन पक्ष दुरावणार का? हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात एकत्रित लढून लोकसभेत मिळालेलं यश आणि विधानसभेत झालेला पराभव. या सगळ्याचा विचार करून मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा आम आदमी पार्टी प्रमाणे स्वबळाचा नारा देणार? एकत्रित येऊन पुन्हा एकदा नव्या जोमाने निवडणुकांना सामोरे जाणार हे निवडणुका जाहीर झाल्यानंतरच कळेल.
केजरीवाल फोटोसह
संविधानाच्या विटंबनेनंतर परभणीत दंगल, वाहनांती तोडफोड, लाठिचार्ज

परभणी, दि. ११ : मराठवाड्यातील परभणीत संविधान पुस्तिकेच्या विटंबनेनंतर आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या हाकेला हिंसक वळून लागलं असून आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर बंद दुकानांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. तसेच पोलिसांच्या गाडींवर ही दगडफेक करण्यात आली, काही गाड्यांची मोडतोडही आंदोलकांकडून करण्यात आली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी ॲक्शन घेत, या आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळाले. तसेच शहरांमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकेच्या विटंबण्याच्या प्रकरणात आज परभणी बंद करण्यात आले होते. या बंदला हिंसक वळण लागले, आंदोलन करत असलेल्या काही तरुणांनी गाड्यांची तोडफोड केली, तर काहींनी पोलिसांच्या गाड्यांवरही दगडफेक केल्याची घटना घडली. परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरामधील व्यापाऱ्यांनी बाहेर ठेवलेले पीव्हीसी पाईप पेटवून देण्यात आले असून या पाईपला मोठ्या प्रमाणावर आग लागल्याचं पाहायला मिळालं. एकूणच येथील आंदोलनास हिंसक वळण लागल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरला असून दंगा काबू पथकही रस्त्यावर उतरले आहे. शहरातील आर.आर. टॉवर परिसरामध्ये प्रचंड दगडफेक आंदोलकांकडून करण्यात आली. पोलिसांच्या गाडीवर ही दगडफेक करण्यात आली असून हातात काठ्या घेऊन हे आंदोलक शहरात फिरताना दिसले, विशेष म्हणजे बंद दुकानांवरही दगडफेक केली जात होती. त्यामुळे, पोलीस व सुरक्षा पथकांनी रस्त्यावर उतरुन सौम्य लाठीचार्ज केला आहे.

वसमतमध्येही भव्य मोर्चा
दरम्यान, परभणीतील घटनेच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यातल्या वसमतमध्ये सुद्धा आंबेडकरी जनता आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. त्या घटनेच्या निषेधार्थ आज वसमत शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. मोर्चा काढत आंबेडकरी जनतेच्यावतीने त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. वसमत शहरातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा तहसील कार्यालयाच्या दिशेने निघाला होता, या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी जनता सहभागी झाली. उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जात आंबेडकरी जनतेच्यावतीने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

प्रकाश आंबेडकरांचा इशारा
परभणीत मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येत्या 24 तासांत प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. तसेच ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी असल्याचेही म्हटले आहे