आप, सपा पाठोपाठ काँग्रेसची तृणमूल बरोबरची जागावाटपाची चर्चा यशस्वी होण्याची चिन्हे

0
234

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राम राम करत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा हात धरल्याने इंडिया आघाडी ढासळताना दिसत होती. समाजवादी पक्ष, आप पाठोपाठ काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जागावाटपाच्या चर्चा यशस्वी होत असल्याने इंडिया आघाडी सावरताना दिसत आहे.

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या विचारांना आणि धोरणांना विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांनी स्थापन केलेली इंडिया आघाडी ढासळताना दिसत होती. या आघाडीचे संकल्पक असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीच आघाडीला राम राम करत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा हात धरल्याने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला होता. त्यातच जागावाटपाबाबत इंडिया आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांचे मतभेद जाहीर होत असताना स्थिती अधिकच खालावत असल्याचे दिसत होते. मात्र गेल्या काही दिवसांत हीच इंडिया आघाडी सावरताना पुन्हा ताकदवान होत असल्याचे चित्र आहे.

परस्पराच्या संमतीने पंजाबमध्ये काँग्रेस आणि आप हे आघाडीतील दोन पक्ष विरोधात निवडणूक लढवणार आहेत. एकत्र लढल्यास विरोधी पक्षांचा अवकाश अन्य पक्ष व्यापण्याची शक्यता लक्षात घेऊनहा हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. आता हेच दोन्ही पक्ष दिल्लीत प्रबळ असलेल्या भारतीय जनता पक्षाविरोधात एकत्र लढणार आहेत. त्यांच्यात आप चार आणि काँग्रेस तीन मतदारसंघात निवडणूक लढविण्यावर एकमत झाले आहे. त्याचबरोबर गुजरात, हरियाणा आदी राज्यांतही निवडणूक एकत्र लढवण्यावर एकमत झाले आहे. लोकसभेसाठी सर्वाधिक महत्त्वाचे राज्य असलेल्या उत्तरप्रदेशातही समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये एकमत झाले आहे. देशातील चार राज्यांमध्ये काँग्रेसनं जागा वाटपावर यशस्वी तोडगा काढला आहे. पश्चिम बंगालमध्ये यापूर्वी ‘एकला चलो’ चा नारा दिलेल्या ममता बॅनर्जी पुन्हा काँग्रेससोबत चर्चेला तयार झाल्याचे वृत्त आहे. विविध माध्यमांतील वृत्तांनुसार, पश्चिम बंगालमधील ४२ जागांपैकी काँग्रेसला चार जागा तर उर्वरित जागा तृणमूल काँग्रेस लढवण्यावर सहमती होत असल्याची माहिती आहे. मेघालय आणि आसाममध्ये तृणमूल काँग्रेस प्रत्येक एक जागा लढवणार आहे. दोन्ही पक्षांमध्ये मेघालयातील तुरा या लोकसभेच्या जागेवरुन सध्या चर्चा अडकली आहे. ही जागा तृणमूलला देण्यास काँग्रेसचा विरोध असल्याचं सांगितलं जात आहे. याच तुरा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला ९ टक्के, भाजपला १३ टक्के, तृणमूलला २८ टक्के तर एमएमपीला ४० टक्के एवढे मतदान झाले होते. त्यामुळे या जागेवर तृणमूलनं दावा केला आहे.

आगामी लोकसभा निवडणूक तृणमूल काँग्रेस एकट्यानं लढवणार असल्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जानेवारी महिन्यात घोषणा केली होती. यामुळं इंडिया आघाडीला मोठा झटका बसला होता. राहुल गांधींची ‘भारत जोडो न्याय’ यात्रा पश्चिम बंगलमध्ये प्रवेश करणार होती, त्याचवेळी ममतांनी ही घोषणा केली होती. त्यावेळी अशीही चर्चा होती की तृणमूल काँग्रेसनं काँग्रेसला २ जागांचा प्रस्ताव दिला होता. काँग्रेसला हा प्रस्ताव मान्य नव्हता. दरम्यान, दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीसोबत काँग्रेसची युती झाली असून उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीबरोबरही जागा वाटपावर एकमत झाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस १७ जागांवर लढणार आहे, तर इतर ६३ जागाांवर सपासह इंडिया आघाडीतील इतर उमेदवार लढणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस ज्या जागा लढणार आहे त्यात रायबरेली, अमेठी या खुद्द गांधी परिवाराच्या पारंपारिक मतदारसंघासह इतर जागांचा समावेश आहे.