आप आणि काँग्रेसची आघाडी, लोकसभा-विधानसभेसाठी शुभसंकेत

0
128

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीसाठी सकारात्मक बातमी आहे. एकीकडे जागावाटपाची चर्चा सुरू असताना काँग्रेस आणि आपमध्ये एका निवडणुकीसाठी आघाडी झाली आहे. ही निवडणूक विधानसभा किंवा लोकसभेची नसली तरी दोन्ही पक्षांनी टाकलेले हे पहिले पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

इंडिया आघाडीमध्ये काँग्रेससाठी आप हा महत्त्वाचा पक्ष आहे. दिल्ली आणि पंजाबसह इतर काही राज्यांमध्येही ‘आप’ने आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या दोन्ही पक्षांमध्ये लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरू असून लवकरच त्यावर अंतिम निर्णय होईल, असे नेत्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, त्याआधीच दोन्ही पक्षांमध्ये चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडी झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवनकुमार बन्सल यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, आप महापौरपदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार उतरवणार असून काँग्रेस उपमहापौरपदाची निवडणूक लढवणार आहे. लोकसभा निवडणुका नंतर आहेत. त्याआधीच आम्ही महापालिकेच्या निवडणुकीत एकत्र आलो आहोत. त्यामुळे आमचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास बन्सल यांनी व्यक्त केला.

महापौरपदाच्या निवडणुकीत 35 नगरसेवक मतदान करणार आहेत. भाजपकडे 14 नगरसेवक आहेत. आम आदमी पक्षाचे 13 आणि काँग्रेसचे सात नगरसेवक आहेत. दोन्ही पक्षांचे मिळून 20 नगरसेवक असल्याने निवडणूक सध्यातरी एकतर्फी वाटत आहे. शिरोमणी अकाली दलाचा एक नगरसेवक आहे. बहुमतासाठी 18 मतांची गरज आहे. या निवडणुकीत भाजपकडूनही जोर लावला जाण्याची शक्यता आहे.

चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत झालेली आघाडी काँग्रेस आणि आपसाठी सकारात्मक संकेत मानले जात आहेत. या निवडणुकीत मतांमध्ये फाटाफूट न झाल्यास या आघाडीचे उमेदवार विजयी होतील. हाच पॅटर्न पुढे लोकसभेतही कायम राहिल्यास दोन्ही पक्षांना फायदेशीर ठरू शकतो, अशी चर्चा आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ही निवडणूक 18 जानेवारीला होणार आहे