आपल्या कुटुंबाप्रमाणे निसर्गावर प्रेम करा : कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे.गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या मागण्यांना यश

0
2

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) : वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. वर्षभर वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे. आज केलेले पर्यावरण रक्षण म्हणजे उद्याच्या पिढिसाठी ऑक्सिजनची सोय आहे. त्यामुळे निसर्गाशी आदराने वागा, आपल्या कुटुंबाप्रमाणे निसर्गावर प्रेम करा, असे आवाहन कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले.
गुणवंत कामगार कल्याण मंडळ, मराठवाडा जनविकास संघ, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, सनफ्लॉवर पब्लिक स्कूल मारुंजी यांच्या संयुक्तपणे सनफ्लॉवर पब्लिक स्कूलच्या प्रांगणात १०० देशी फळझाडांचे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रविराज इळवे बोलत होते. यावेळी राज्य शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वृक्षमित्र पुरस्कारप्राप्त अरूण पवार, डॉ. भारतीताई चव्हाण, सहाय्यक आयुक्त मनोज पाटील, गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे शहराध्यक्ष महमंदशरीफ मुलाणी, सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने, एसपी स्कुलचे संस्थापक अंकुशराव बोडके, अधिक्षक संजय थोरात, प्रदिप बोरसे, संदिप गावडे, अनिल कारळे, सुनिल बोराडे आदी उपस्थित होते.


वृक्षपुजन व पालखी पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग गात वृक्षदिंडी काढण्यात आली. ढोल लेझीम पथक, विविध वृक्षांची प्रतिकृती परिधान केलेले विद्यार्थी, हातात पर्यावरण जनजागृतीचे फलक घेतलेले गुणवंत कामगार, तसेच ‘कावळा म्हणतो काव काव, एकतरी झाड लाव’ अशा घोषणा देत ज्ञानोबा, तुकोबांचा जयघोष करीत, पर्यावरणाचे प्रबोधन करीत वृक्षदिंडीचा शाळेच्या प्रांगणात समारोप करण्यात आला.
डॉ.भारतीताई चव्हाण म्हणाल्या, की माण, मारुंजीमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे केंद्र सुरु व्हावे व कामगार भूषण पुरस्काराचा कालावधी १० वर्षाऐवजी ५ वर्ष करावा, या मागणीला आयुक्तांनी तत्वतः मान्यता दिली.
अरुण पवार म्हणाले, की ग्लोबल वॉर्मिंगमुळे आज पर्यावरण रक्षणाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. तरच भविष्यात आपल्याला पुरेसा ऑक्सिजन मिळेल.
दरम्यान, विद्यार्थींनी तनुश्री कारकर हिला राज्यस्तरीय फाउंडेशन परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल गौरविण्यात आले. महमंदशरीफ मुलाणी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे अयोजन बाळासाहेब साळुंके, नंदकुमार धुमाळ, महेंद्र गायकवाड यांनी केले. वृक्षारोपणासाठी लागणारी सर्व झाडे वृक्षमित्र अरुण पवार यांनी दिली. त्यांनी संस्थेला वेळोवेळी मदत केल्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तानाजी एकोंडे, अण्णा जोगदंड, ज्ञानेश्वर मलशेट्टी, अण्णा गुरव, शंकर नाणेकर, काळुराम लांडगे, सुरेश कंक, संजय चव्हाण, हेमंत पवार, रघुनाथ फेगडे, रविंद्र रायकर, शिवराज शिंदे, संदिप रांगोळे, पांडुरंग सुतार, मुरलीधर दळवी, गणेश गुरव यांनी परिश्रम घेतले.