आपली औकात ओळखावी आणि अंथरूणावर पडून राहा- नारायण राणेंचा प्रहार

0
123

जालना, दि. १४ (पीसीबी) – सगेसोयऱ्याचा कायद्याची अंमलबजावणी आणि अन्य मागण्यासांठी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचं जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पाच दिवसांपासून उपोषण सुरू आहे. अशातच जरांगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकही सभा महाराष्ट्रात होऊ न देण्याचा इशारा दिला होता. याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “पंतप्रधान महाराष्ट्रात आल्यावर जागेवरून हलून दाखवा. तुम्हाला मराठ्यांची खरी ताकद दाखवून दिली जाईल,” असा इशारा नारायण राणेंनी जरांगेंना दिला आहे.
नारायण राणेंनी ‘एक्स’ अकाउंटवर ट्विट केलं आहे. त्यात राणे म्हणाले, “मनोज जरांगे-पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यानं ते काहीही बडबड करायला लागले आहेत. त्यांना मी मराठ्यांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी बेताल बडबड त्यांनी केली. त्यांनी आपली मर्यादा ओलांडली आहे.”

“पंतप्रधान महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी जागेवरून हलून दाखवावं. तुम्हाला मराठ्यांची खरी ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरूणावर पडून राहत नाटके करावी,” असंही राणेंनी जरांगेंना फटकारलं आहे.

जरांगे-पाटील काय म्हणाले होते?
“सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी पिणार नाही. तसेच, मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही. मराठ्यांची लाट उसळली असून सरकारचे डोळे गेलेत का? सरकारला अक्कल नाही का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांची फसवणूक करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार छगन भुजबळांना वेळ देत आहेत. सगळ्यांचा हिशोब होणार,” असं जरांगेंनी म्हटलं.

“फालतूपणा चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची राज्यातील एकही सभा होऊ देणार नाही. आमच्या तरूणांचे मुदडे पडण्याची वाटत पाहत आहात का? माझा जीव गेला तरी मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार,” असा एल्गार जरांगेंनी व्यक्त केला होता.
“माझा जीव गेल्यावर महाराष्ट्रातील सरकार राहिल का? मंत्री-आमदार घरी राहतील का? दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात होईल,” असा इशाराही जरांगेंनी सरकारला दिला होता