आपला परिवार सोशल फाउंडेशन`कडून श्रीक्षेत्र देहूत १०८ देशी झाडांची लागवड…

0
354

देहूगाव, दि. १८ (पीसीबी) – आपला परिवार सोशल फाउंडेशन व वृक्षदायी संस्था यांच्या माध्यमातून देहूगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणात निसर्ग मित्रांचा यथोचित सन्मान करण्यात आला.याप्रसंगी वृक्षदायी संस्थेचे अध्यक्ष श्री. शिवाजी मोरे, आपला परिवार संस्थेचे प्रमुख श्री.सुदामदादा शिंदे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासक श्री. कैलासजी पानसरे, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. सुनील कंद, अभंग इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या, डॉ.कविता अय्यर मॅडम, डॉ. किशोर यादव सर, डॉ. धोटे सर,‌ माजी उपसरपंच संतोष हगवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

वृक्षदायी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना ‘आपण निसर्गाशी सदैव कृतज्ञ असले पाहिजे… या झाडांनी माणसाला भरभरून दिले. या झाडांविषयी आपण नातं जोडलं पाहिजे. झाड लावणे हे एक टक्के काम असते परंतु या झाडांचे संवर्धन करणे, त्याला सांभाळणे हे पुढील 99% काम असते. यासाठी वृक्षदायी संस्था वृक्षरोपणा समवेत वृक्ष संवर्धनाचे महत्त्वपूर्ण काम करीत आहे. आई ही मुलाला जन्म देते पण त्या मुलाला सांभाळण्याचे कार्य दाई करीत असते. म्हणूनच या संस्थेला नाव वृक्षदायी संस्था देण्यात आले आहे.’ असे मत व्यक्त करीत वृक्षदायी संस्थेचे कार्य सविस्तरपणे यावेळी त्यांनी विशद केले.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे या अभंग विचारातून निसर्गाशी नातं जोडणाऱ्या सर्व मित्रांचा उत्साह अतिशय कौतुकास्पद होता. या वृक्षारोपण कार्यासाठी आपला परिवार संस्थेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील 108 कुटुंबांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता. प्रत्येक कुटुंबाकडून एक झाड याप्रमाणे 108 देशी झाडे याप्रसंगी लावण्यात आली. तसेच आपला परिवार सोशल फाउंडेशनकडून श्रीक्षेत्र भंडारा डोंगर परिसरात लावण्यात आलेल्या वृक्षांना सिंचनासाठी ५००० लिटर क्षमतेची टाकी भेट देण्यात आली. आपला परिवार संस्थेच्या माध्यमातून विविध सेवाभावी सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. आपला परिवार संस्थेच्या सर्व बंधू-भगिनिंचे सेवाभावी कार्य आणि समाजालाही नित्य प्रेरणादायी आहे. वृक्षदायी संस्था अतिशय सेवाभाव मनात ठेऊन जनमनात निसर्गाविषयी प्रेमभाव जागृत करून वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचे कार्य अतिशय संवेदनशीलतेने करीत आहे.