आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज ठेवा

0
2

: आयुक्त शेखर सिंह यांचे निर्देश, मान्सूनपूर्व तयारीचा घेतला आढावा

पिंपरी, दि. २२ – हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी आणि आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा, असे निर्देश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले.

महानगरपालिकेतील दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात झालेल्या मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत आयुक्त सिंह बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, मुख्य वित्त लेखा अधिकारी प्रवीण जैन, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उप आयुक्त अण्णा बोदडे, नगर विकास विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांच्यासह सह शहर अभियंता, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, क्षेत्रिय अधिकारी, आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचते, अशी ठिकाणे तात्काळ शोधून काढून तेथे कायमस्वरुपी उपाययोजना करा. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, यादृष्टिने नियोजन करा. शहरातील धोकादायक इमारतींना नोटीस देण्यासोबतच तेथील नागरिकांना आपत्कालीन परिस्थिती सुरक्षितस्थळी हलवण्याचे नियोजन करा. पूरजन्य परिस्थितीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना राहण्यासाठी शाळांचे नियोजन करा. नदीकाठी असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असल्याने अशा नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे नियोजन करा, असेही निर्देश आयुक्त सिंह यांनी यावेळी दिले.

नागरिकांच्या मदतीसाठी पथके राहणार कार्यरत
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ मदत मिळावी, यासाठी जलद प्रतिसाद पथके कार्यरत करण्याबाबत आयुक्त सिंह यांनी निर्देश दिले आहेत. या पथकांमध्ये आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन, आरोग्य, विद्युत, स्थापत्य, उद्यान अशा विविध विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश करून रात्रीच्यावेळी देखील ही पथके कार्यरत ठेवावेत, असेही आयुक्त सिंह यांनी सांगितले.

अनधिकृत व धोकादायक होर्डिंग काढण्याचे दिले आदेश
आकाशचिन्ह विभागाने शहरातील अनधिकृत व धोकादायक होर्डिंग तातडीने काढून घ्यावेत. दोन दिवसांमध्ये हे काम पूर्ण करण्यात यावे. शहरात नालेसफाईच्या सुरू असलेल्या काम तात्काळ पूर्ण करावे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रत्येक विभागाने एकमेकांशी समन्वय ठेवावा. क्षेत्रीय अधिकारी यांनीही त्यांच्या प्रभागात आपत्कालीन यंत्रणा सक्षम करावी, असे निर्देशही आयुक्त सिंह यांनी दिले.