आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी एनडीआरएफ यंत्रणा सज्ज

0
188

पिंपरी,दि.28(पीसीबी) – राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे कमांडंट संतोष सिंह यांनी आज  महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली. शहरात उद्भवणाऱ्या आपत्कालीन घटनांप्रसंगी महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम आणि तत्पर होण्याच्या दृष्टीने तसेच आपत्कालीन परिस्थितीत एनडीआरएफ आणि महापालिका आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांच्यातील  समन्वयाच्या  दृष्टीने या  भेटीत चर्चा झाली.आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी एनडीआरएफ यंत्रणा सज्ज असल्याचे संतोष सिंह यांनी सांगितले.

 महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशामक विभाग, वैद्यकीय विभाग, एनडीआरएफ, महाराष्ट्र पोलीस दल आणि इतर आस्थापनांच्या  यंत्रणा यांच्यासाठी  संयुक्त सराव, प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्याबाबत आयुक्त शेखर सिंह आणि कमांडंट संतोष सिंह यांच्यामध्ये विचारविनिमय झाला. यावेळी डेप्युटी कमांडंट दिपक तिवारी, महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल उपस्थित होते.

औद्योगिकनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आहे. याठिकाणी अनेक मोठ्या औद्योगिक संस्था असून यामध्ये रासायनिक वायुंचा वापर करणाऱ्या अपघात प्रवण औद्योगिक संस्थांचाही समावेश आहे. 

शिवाय पिंपरी-चिंचवड शहरातून तीन नद्या वाहतात, पावसाळ्यात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होते. औद्योगिक परिसरात वायू गळती, रासायनिक आग अशा घटना घडल्यास काही वेळा आपत्कालीन परिस्थितीत  एनडीआरएफला पाचारण करावे लागते. त्यादृष्टीने शहरातील आपत्तीच्या घटना  हाताळण्यासाठी  महापालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला  आहे. इमारत कोसळणे, औद्योगिक परिसरातील रसायन गळती आदी आपत्कालीन घटना घडल्यास तसेच रासायनिक हल्ल्यासारखी गंभीर परिस्थिती उद्भवल्यास शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असली पाहिजे. यामध्ये एनडीआरएफची भूमिका महत्वाची असते.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जात असताना  शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम असणे गरजेचे आहे. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व यंत्रणांमध्ये योग्य समन्वय राहावा यासाठी एनडीआरएफच्या माध्यमातून तात्काळ प्रतिसाद म्हणून करावयाच्या उपाययोजनांबाबत महापालिका, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, महाराष्ट्र पोलीस दल यांच्यासह इतर संबंधित यंत्रणांचा संयुक्त सराव, प्रात्याक्षिके आणि प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्याचा उद्देश असल्याचे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी यावेळी सांगितले.   शहरातील आपत्तीविषयक घटनांबाबत कमांडंट संतोष सिंह यांनी यावेळी माहिती घेतली. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी एनडीआरएफ यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.