आपण या पदासाठी स्पर्धेत नाही – शरद पवार

0
209

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) : राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर देशभरातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. विरोधी पक्षांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी पुढे आणले जात आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली होती. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रीय स्तरावर अशा घडामोडी सुरू असताना स्वत: शरद पवार यांनी मात्र आपण या पदासाठी स्पर्धेत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

‘मी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसून या निवडणुकीत उमेदवार होणार नाही,’ असं शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत कॅबिनेट मंत्र्यांना सांगितल्याची माहिती आहे. पवार यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे विरोधी पक्षांममध्ये पुन्हा एकदा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.

निवडणूक आयोगाने देशाचे नवे राष्ट्रपती निवडण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू केली असून, राष्ट्रपतीपद निवडणुकीचे मतदान १८ जुलैला होणार आहे. या निवडणुकीसाठी केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नवीन राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा २१ जुलैला जाहीर होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीत विविध राजकीय पक्षांशी चर्चा करण्यासाठी भाजपने पक्षाध्यक्ष जगतप्रसाद नड्डा व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नावांची रविवारी घोषणा केली.

सध्याच्या राजकीय गणितानुसार भाजप जो कोणी उमेदवार देईल, तो राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहज विजयी होईल, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. त्यामुळेच भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या घोषणेकडे राजकीय पंडितांचे लक्ष लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती धक्कातंत्राची आहे. यापूर्वी २०१७च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर करून, त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.