आपचे तीनही उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध

0
349

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) : राज्यसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दबदबा राहिला. दिल्लीतून देण्यात आलेल्या तीनही उमेदवारांचा बिनविरोध राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्याविरोधात एक अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे तिघांच्या विजयाची घोषणा करण्याची केवळ औपचारिका उरली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडून सायंकाळी याबाबत घोषणा केली जाईल.

कथित मद्य घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले खासदार संजय सिंग पुन्हा राज्यसभेत जाणार आहेत. तुरुंगात असतानाही आपने (AAP) त्यांना उमेदवारी देत एकप्रकारे केंद्र सरकारला सूचक इशारा दिला होता. न्यायालयानेही त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी परवानगी दिली होती. आता विजयाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी ते काही वेळासाठी तुरुंगातून बाहेर येतील.

संजय सिंग यांच्याप्रमाणेच दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) बिनविरोध विजयी झाल्या आहेत. त्या पहिल्यांदाच राज्यसभेत जातील, तर तिसरे उमेदवार नारायण दास गुप्ता यांना राज्यसभेवर दुसऱ्यांदा संधी मिळणार आहे. गुप्ता आणि सिंग यांची मुदत 27 जानेवारीला संपणार आहे.

तीन जागांसाठी 19 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते. अर्ज भरण्याची मुदत 9 जानेवारी होती. यादरम्यान केवळ तिघांचे अर्ज आले. त्याचवेळी निवडणूक बिनविरोध होणार, हे स्पष्ट झाले होते. अर्जांची छाननी 10 जानेवारीला पार पडली, तर अर्ज मागे घेण्याची मुदत 12 जानेवारी म्हणजे आजपर्यंत आहे. तिघांचेही अर्ज छाननीत वैध ठरले. त्यामुळे आता आजच त्यांना विजयाचे प्रमाणपत्र मिळू शकते.