आनंद महिंद्रांचं ट्वीट चर्चेत! पुलाखाली मैदानाची कल्पना भलतीच आवडली, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले, “हे प्रत्येक शहरात..”

0
314

मुंबई, दि. २९ (पीसीबी) : मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबई हे असं शहर आहे जिथे आता मुलांना खेळण्यासाठी मोजकीच मैदानं उरली आहेत असं सातत्याने म्हटलं जातं. अशात नवी मुंबईतला एक व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला आहे. नवी मुंबईत एका पुलाच्या खाली मुलं क्रिकेट, बास्केटबॉल आणि बॅडमिंटनसारखे खेळ खेळतानाचा व्हिडीओ आहे. पुलाखाली खेळाचं मैदान तयार करण्याची ही कल्पना आनंद महिंद्रांना आवडली आहे. त्यांनी हा व्हिडीओ ट्विट करत एक अनोखी सूचनाही केली आहे. ज्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक तरूण नवी मुंबईतल्या पुलाखाली तयार करण्यात आलेल्या खेळाच्या मैदानाविषयी सांगतो आहे. तो तरूण म्हणतो, “मी नवी मुंबईत आहे. इथे एका पुलाखाली खेळाचं मैदान तयार केलं आहे. या ठिकाणी मुलं क्रिकेट, बॅडमिंटन आणि बास्केटबॉल खेळू शकतात. इतकंच नाही तर क्रिकेट खेळताना बॉल बाहेर जाऊ नये म्हणून इथे नेटही लावण्यात आली आहे. या खेळाच्या मैदानावर खेळण्यासाठी तुम्हाला कुठलंही शुल्क भरावं लागत नाही. ” या व्हिडीओत काही मुलं क्रिकेट खेळताना दिसत आहेत. आनंद महिंद्रा यांनी हाच व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी म्हटलं आहे Transformational. Let’s do this. In every city. अशा ओळी लिहिल्या आहेत.

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती आहे. पुलाखाली खेळाचं मैदान तयार करण्याच्या या कल्पनेचं अनेक नेटकरी कौतुक करत आहेत. या व्हिडीओला ३ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ७३ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते अशा प्रकारचे विविध व्हिडीओ कायमच पोस्ट करत असतात.

https://twitter.com/anandmahindra/status/1640590426129461254?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1640590426129461254%7Ctwgr%5Ee9b5a5c8d7a33d91c04e5e53ff5a97da03c3b75e%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fpublish.twitter.com%2F%3Fquery%3Dhttps3A2F2Ftwitter.com2Fanandmahindra2Fstatus2F1640590426129461254widget%3DTweet