आनंदनगर झोपडीधारकांची तात्पुरती व्यवस्था गांधी स्मारका शेजारी

0
2

पिंपरी, दि. २७ – चिंचवड स्टेशन येथील आनंदननगर झोपडपट्टी प्रकल्प पुनर्वसनाच्या (SRA) पहिल्या टप्प्यातील ११०० घरांचे काम लवकरच सुरू होणार आहे. दरम्यान, या झोपडीधारकांसाठी तात्पुरती व्यवस्था (संक्रमण शिबिर) मुंबई-पुणे महामार्गालगत पूर्वीच्या गरवारे नायलॉन कंपनी जागेवर म्हणजेच गांधी स्मारकाच्या शेजारील मोकळ्या ३० गुंठे जागेवर करण्याचे नियोजन आहे. ३० मार्च रोजी होणाऱ्या महापालिका स्थायी समिती सभेत तशा आशयाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
महामार्ग आणि रेल्वे लाईनच्या दरम्यान गेली ५० वर्षांपासून खासगी जागवर ही झोपडपट्टी उभी आहे. १६ एकर जागेवर सुमारे ३५०० झोपड्या आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात ११०० झोपड्यांना जागेवर पक्के घर मिळणार आहे. सुरवातीला १२ मजली इमारती बांधायचे ठरले होते आता तिथे २० ते २२ मजल्यापर्यंत उंच इमारती बांधण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पाच्या शेजारील प्रिमियर कंपनीच्या जागेवर रुनवाल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या टॉवर्समध्ये कोटी कोटी रुपये फ्लॅटचे दर आहे.
साधारणतः तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाज आहे. शहरातील अगदी मोक्याची जागा असल्याने या जागेचे मोल काहीशे कोटी रुपये असल्याने हा प्रकल्प महत्वाचा समजला जातो.
दरम्यान, रेणुका कन्स्ट्रक्शन तर्फे प्रो.प्रा.श्री. बाबु म्हेत्रे यांच्याकडे हे काम सोपविण्यात आले आहे. प्रत्यक्ष कामाला सुरवात कऱण्यासाठी झोपडीधारकांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी चिंचवड येथील सर्वे क्रमांक २९/२ येथील ३०,००० चौरस फुटाची जागा संक्रमण शिबिरासाठी देण्यात येणार आहे. नगररचना उपसंचालक यांनी निश्चित केल्यानुसार मासिक ८.३० रुपये चौरस फुटानुसार तीन वर्षांकरता भाडेतत्वावर ही जागा देण्यात येणार आहे. मंगळवारी होणाऱ्या स्थायी समिती सभेत हा विषय प्रस्तावित आहे.