आध्यात्मिक विचारांशिवाय तरणोपाय नाही!”

0
207

पिंपरी,दि. १७ (पीसीबी) – “आध्यात्मिक विचारांशिवाय तरणोपाय नाही!” असे विचार ज्येष्ठ प्रवचनकार ह.भ.प. किसनमहाराज चौधरी यांनी कै. सोपानराव भोईर विरंगुळा केंद्र, बिजलीनगर, चिंचवड येथे सोमवार, दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी व्यक्त केले. बिजलीनगर ज्येष्ठ नागरिक संघ आयोजित गुरुवार, दिनांक १२ जानेवारी ते सोमवार, दिनांक १६ जानेवारी या कालावधीत पाच दिवसीय स्त्रीसंतमहिमा प्रवचनमालिकेतील अंतिम पुष्प गुंफताना किसनमहाराज चौधरी बोलत होते. माजी नगरसेविका आशा सूर्यवंशी, बबनराव चिंचवडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश निसळ, कार्याध्यक्ष जयवंत भोसले, कोषाध्यक्ष मुरलीधर चोपडे, सहकोषाध्यक्ष बाबूराव पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्त्रीसंतमहिमा या प्रवचनमालिकेंतर्गत मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई यांच्या चरित्राची आणि आध्यात्मिक कार्याची माहिती देताना किसनमहाराज चौधरी पुढे म्हणाले की, “एकता, ममता, समता, बंधुभाव या गोष्टींची शिकवण संतांनी जनमानसात रुजवली. कोमलता, भावुकता, वात्सल्य, भक्तिभाव अशा अनेक गुणांची अनुभूती स्त्रीसंतांच्या चरित्रांतून येते. एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेली बहिणाबाई ही मुलगी तुकोबांसारख्या संतांच्या सहवासात संतपदाला पोहोचली, यांवरून आध्यात्मिक विचारांचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित होते!” अनुराधा चैतन्य, सुनीता जयवंत, शालिनी थोरवे, वैशाली चिटणीस, अशोक भंगाळे, सुरेशसिंह तोमर, अनिल देशपांडे, वाल्मीक शर्मा यांनी संयोजनात सहकार्य केले.