आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर येत्या सोमवारपासून पुणे दौऱ्यावर

0
170

पुणे, दि. ३० (पीसीबी) – आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर येत्या सोमवारपासून (ता. ५) पुणे दौऱ्यावर येत आहेत. सोमवार ते गुरुवार (ता. ८) या चार दिवसांच्या दौऱ्यात ते दहा हजार शेतकरी, सरपंच, औद्योगिक प्रतिनिधी तसेच ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधतील.

सुनील पोतदार यांनी सोमवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी धीरज अगरवाल, स्वामी परवानंद, राजे शास्त्री, कुमकुम नरेन उपस्थित होते. श्री श्री रविशंकर यांच्या भेटीदरम्यान आळंदीजवळील मरकळ येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या त्रिवेणी आश्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या चार दिवसांच्या सोहळ्याची सुरुवात सोमवारी सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत होणाऱ्या रुद्रपूजेने होईल. त्यानंतर दररोज सकाळी श्री श्री रविशंकर हे विविध क्षेत्रांतील मान्यवरांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत चारही दिवस सायंकाळी सत्संग होणार आहे.

तसेच, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैविध्यतेचे दर्शन घडवणारे पोवाडा, शिवराज्याभिषेक सोहळा, नाशिक ढोल, आदिवासी, कोळी नृत्य आणि पुण्याची सांस्कृतिक संपन्नता दर्शविणारे गणेशोत्सव सोहळा, दिंडी, नांदी, गोंधळ असे विविध कार्यक्रम होतील.