आधुनिक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका कटिबद्ध–अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे

0
2

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तालेरा रुग्णालयात फियाट कंपनीच्या सीएसआर निधीद्वारे उभारलेल्या अत्याधुनिक डायलिसिस सेंटरचे उदघाटन

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महापालिकेचा उद्देश सर्वसामान्य नागरिकांना आधुनिक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. तालेरा रुग्णालयात सुरू झालेले हे डायलिसिस सेंटर म्हणजे त्याच दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सुविधेमुळे मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांना जवळच मिळणा-या या सुविधेमुळे त्यांची धावपळ कमी होण्यास मदत होईल असे प्रतिपादन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तालेरा रुग्णालयात महापालिकेच्या वतीने नवीन डायलिसिस केंद्र उभारण्यात आलेले आहे या केंद्रासाठी फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड (FIAPL) कंपनीच्या सहकार्याने सीएसआर फंडातून ८ डायलिसिस मशिन अत्याधुनिक बेडसह देण्यात आले आहेत, या डायलिसिस सेंटरचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त खोराटे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डाॅ.राजेंद्र फिरके,डाॅ.संगिता तिरूमणी,डाॅ.संजय सोनेकर,डाॅ.लक्ष्मीकांत अत्रे, डाॅ.अलवी नासिर,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सीएसआर मुख्य सल्लागार विजय वावरे, फियाट कंपनीच्या मानव संसाधन विभागाच्या सहाय्यक उपाध्यक्ष संचिता कुमार, सीएसआर उप व्यवस्थापक शुभम बडगुजर आणि अमोल फटाळे यांच्यासह महापालिकेच्या सीएसआर सल्लागार श्रुतिका मुंगी तसेच रुग्णालयातील कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त खोराटे म्हणाले,आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तालेरा आणि जिजामाता रुग्णालयात सुरू झालेल्या या डायलिसिस सेंटरमध्ये उच्च दर्जाची यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रांमध्ये अत्याधुनिक डायलिसिस मशीन, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी, रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र बेडची सोय, आपत्कालीन उपचाराची तत्पर सुविधा आणि रुग्णांसाठी स्वच्छ, सुसज्ज वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. महापालिकेच्या या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, आरोग्यसेवा अधिक परिणामकारकरीत्या नागरिकांपर्यंत पोहोचेल.

दरम्यान, फियाट कंपनीने मागील वर्षी सीएसआर फंडातून २८० दिव्यांग मुलांना कृत्रिम अवयव, व्हीलचेअर्स, श्रवणयंत्रे आदी साहित्याचे वितरण केले होते. तर यावर्षी तालेरा रुग्णालय येथे ८ खाटांचे तर जिजामाता रुग्णालय येथे ४ खाटांचे डायलिसिस मशिन,अत्याधुनिक बेडसह फियाट कंपनीच्या सीएसआर फंडातून देण्यात आले आहेत तसेच या डायलिसीस सेंटर साठी एमक्युअर कंपनीच्या सीएसआर फंडातून आर.ओ. प्लॅन्ट देखील बसविण्यात आला आहे.

डायलिसिस सेंटरमध्ये रुग्णांसाठी मिळणाऱ्या सुविधा:

• अत्याधुनिक डायलिसिस मशीनची सुविधा

• प्रशिक्षित डॉक्टर व तज्ज्ञ तंत्रज्ञांची उपलब्धता

• प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र व स्वच्छ बेडची सोय

• आपत्कालीन उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा

• निर्जंतुकीकरण आणि स्वच्छतेची काटेकोर काळजी

• रुग्णांच्या सोयीसाठी आरामदायी,हवेशीर व सुरक्षित वातावरण

• वेळोवेळी आरोग्य तपासणी व मार्गदर्शनाची सोय

• लिफ्टची सोय

पिंपरी चिंचवड महापालिका गेल्या काही वर्षांत आरोग्य सेवेत सातत्याने सुधारणा करत आहे. तालेरा,जिजामाता व आकुर्डी रुग्णालयात नव्या डायलिसिस युनिटची भर पडल्याने आरोग्य सेवांच्या उपलब्धतेत आणखी वाढ झाली आहे. तालेरा रुग्णालयातील हे डायलिसिस युनिट पिंपरी चिंचवडकरांसाठी दिलासा देणारे ठरणार असून महापालिकेच्या ‘सर्वांसाठी आरोग्य’ या संकल्पनेला बळकटी देणार आहे.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका