आदिवासी संघटनेच्या महाराष्ट्र दौऱ्यास प्रारंभ; क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी संघटनेचा उपक्रम

0
271

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) : महाराष्ट्रातील आदिवासी समाजाला त्यांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य यांची जाणीव व्हावी तसेच आदिवासी समाजाने मूळ प्रवाहात यावे याची जनजागृती करण्यासाठी क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र दौऱ्यास प्रारंभ करण्यात आला, अशी माहिती क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग प्रचंडराव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,महाराष्ट्रातील आदिवासिंमध्ये हक्क,कायदे आणि माहितीचा अद्यापही बऱ्याच प्रमाणात अभाव आहे. याचीच दखल घेत क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग प्रचंडराव यांनी महाराष्ट्र दौऱ्यास संविधान दिनाच्या पूर्व संध्येला प्रारंभ केला आहे. क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी क्रांती रथाचे जनआंदोलन चळवळीचे प्रणेते मानव कांबळे यांच्या हस्ते भगवा ध्वज दाखवून या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मानव कांबळे म्हणाले की,महाराष्ट्रातील आदिवासींच्या विविध समस्या सोडवण्यासाठी व समाज बांधवांमधे आपल्या हक्क व अधिकारा बाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी या उपक्रमाची सुरुवात पिंपरी चिंचवड शहरातून होणे,अभिमानास्पद आहे. या देशातील मूळ आदिवासींचा येथील जल,जंगल,जमिनीवर प्रथम अधिकार आहे.पण याचे संरक्षण करण्याऐवजी केंद्र सरकार आदिवासींच्या जमिनी भांडवलदारांना सर्रासपणे देत आहे.आदिवासींच्या हक्कावर गदा आणत आहे. हे सर्व थांबवण्यासाठी क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग प्रचंडराव यांनी सुरू केलेले हे अभियान कौतुकास्पद आहे.ही यात्रा जन जागृती करत महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात फिरणार असून या यात्रेचा समारोप पंचवीस डिसेंबर रोजी जालना येथे होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग परचंडराव यांनी प्रास्ताविक मनोगतात सांगितले.

दरम्यान, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रकाश जाधव हे होते.यावेळी जाधव यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हटले की,आदिवासी समाजासाठी हि संघटना,कार्यकर्ते प्रचंड परिश्रम करत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. या वेळेस प्रमुख पाहुणे म्हणुन संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुनिता शिंदे उपस्थित होत्या.शहराध्यक्ष अजिंक्य राऊत यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा जाधव यांनी केले.मान्यवरांच्या उपस्थितीत छ.शिवाजी महाराज,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना अभिवादन करून संघटनेचे संस्थापक पांडुरंग परचंडराव असंख्य कार्यकर्त्यांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथून महाराष्ट्र दौर्‍यावर जुन्नरकडे रवाना झाले.