आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याने शिंदे- फडणवीस अस्वस्थ

0
264

– बंडखोर, हरामखोर, गद्दार अशा शेलक्या शब्दांमुळे बंडखोर आमदार संतापले

औरंगाबाद, दि. २५ (पीसीबी) : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या ठाणे, भिवंडी, मनमाड, नाशिक, औंरगाबाद, नेवासा, शिर्डी येथील शिवसंवाद दौऱ्याला मिळालेला प्रतिसाद पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखीलअ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुख्यमंत्री आपल्या गावी मोहिमेअंतर्गत शिंदे येत्या ३० व ३१ जुलै रोजी नाशिक, औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. अब्दुल सत्तार यांनी ही माहिती प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली.

आदित्य ठाकरे यांच्या आजवरच्या दौऱ्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याने शिंदे आणि फडणवीस हे दोघेही अस्वस्थ असल्याचे समजले.राज्यात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खादारांनी पुकारलेल्या बंडानंतर ठाकरे पिता-पुत्र आक्रमक झाले आहेत. बंडखोर, गद्दारांच्या मतदारसंघात जाऊन आदित्य ठाकरे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तर उद्धव ठाकरे यांचे शिवसेना भवनात बैठकांचे सत्र सुरू आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्या ठाण्यापासून शिवसंवाद मोहिमेला सुरूवात केली होती. शिर्डी येथे साई बाबांचे दर्शन घेऊन त्यांच्या या दौऱ्याचा समारोप झाला होता.

या संपुर्ण मोहिमेत आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भाषण करत बंडखोरांवर जोरदार हल्ला चढवला होता, विशेष म्हणजे बंडखोरांच्या मतदारसंघात त्यांना प्रचंड प्रतिसाद देखील मिळाला. औरंगाबाद जिल्ह्यात संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात तर आदित्य ठाकरे यांना पाहण्यासाठी हजारोंची गर्दी जमली होती. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या गर्दीची तुलना नाथसागराशी केली.यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची घोषणा यापुर्वीच करण्यात आली होती. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री हे येत्या ३१ तारखेला औरंगाबादला येणार असल्याचे सांगितले. तत्तपुर्वी ते नाशिक जिल्ह्याचा देखील दौरा करणार आहेत.

आदित्य ठाकरे यांच्यांकडून बंडखोरांचा वारंवार गद्दार असा उल्लेख करण्यात आला होता. शिवाय जे परत येणार असतील त्यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत, पण जे गद्दारीवर कायम राहतील त्यांनी राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान देखील दिले होते. ठाकरे यांच्या या टीकेला आणि आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे यांचा हा दौरा असणार आहे का? हे आता पहावे लागेल.