आदित्य ठाकरेनी केले भाषण, टीडीआर घोटाळेखोराना जेल मध्ये पाठवणार ….

0
177

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमधील शेकडो कोटी रुपयांच्या टीडीआर घोटाळ्यातील आरोपींना जेलची हवा खायला पाठवणार, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितले.

आदित्य ठाकरे यांनी मावळ लोकसभेचा झंझावाती दौरा रविवारी (ता.21) केला. त्यात त्यांनी तळेगाव दाभाडे आणि नंतर पिंपरी येथे जाहीर सभा घेऊन एकप्रकारे लोकसभा निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. विशेष म्हणजे ठाकरे यांना मोठा प्रतिसाद मिळाला. मावळ लोकसभा मतदार संघाच्या प्रचाराचा नारळ फुटला असून महविकास आघाडीचे उमेदवार
संजोग वाघेरे हेच असतील असेही स्पष्ट झाले.
भाजपचे हिंदुत्व हे जातीजातीत, धर्माधर्मांत वाद निर्माण करणारे असल्याचा कड़ाडून हल्लाबोल त्यांनी अय़ोध्येतील सोहळ्याच्या पूर्वसंध्येला केला.

आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी महाशक्ती भाजपकडून जातीजातीत, धर्माधर्मांत वाद पेटविला जाईल, त्या विखुरल्या कशा जातील हे पाहिले जाईल,असा दावा आदित्य यांनी यावेळी केला. पण, महाराष्ट्र धर्म म्हणून आपण एकत्र राहिलो,तर या महाशक्तीला आडवू करु, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

भाजपचे हिंदुत्व हे जाती आणि धर्म विखुरणारे असून आमचे,मात्र ते प्राण जाये, पर वचन न जाये, असे असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप व त्यांच्या केंद्रातील सरकारचा समाचार घेताना त्यांनी राज्य सरकारचा उल्लेख मिंधे, घटनाबाह्य, खोके सरकारनंतर आता अवकाळी सरकार अशी केली. दोन पक्ष आणि एक कुटुंब फोडूनही त्यांना एक उद्योग राज्यात आणता आला नाही, असेही ते म्हणाले.

तळेगाव दाभाडे (ता.मावळ) येथे येऊ घातलेला पावणेदोन लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा, एक लाख रोजगार निर्माण करणारा गुजरातला पळविण्यात आलेला वेदांता -फॉक्सकॉन प्रकल्प आता मुलभूत सुविधांअभावी तेथे नाही, तर देशातही होणार नसल्याचा गौप्यस्फोट आदित्य यांनी या कंपनीच्या हवाल्याने केला. त्यामुळे महाराष्ट्राचे नाही, तर देशाचेही नुकसान झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सगळेच गुजरातला चालले आहे, वर्ल्ड कप फायनलही तिकडे झाली. ती इकडे मुंबईत वानखेडेवर झाली असती, तर भारत जिंकला असता.असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. पिंपरी चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातील त्यांच्या या सभेत मनसेच्या काही माजी पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

आपल्या २५ मिनिटांच्या भाषणात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा जोरदार लक्ष्य केले.त्यांच्या नुकत्याच झालेल्या दावोस दौऱ्यावर गंभीर आरोप केले. त्यांना तेथे फक्त बर्फात जाऊन खेळायचे होते. पाच-सहा दलाल या दौऱ्यात सामील झाले होते.,असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या अगोदरच्या दावोस दौऱ्यात एका दिवसात ३५ कोटी रुपयांचा चुराडा होऊनही एक रोजगार आला नाही. कारण त्यांनी त्यात त्यावेळी केलेल्या मोठ्या रकमेचे करार हे खोटे होते, असा दावाही आदित्य यांनी केला.

राज्यात गेल्या दोन वर्षात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बाजूला ठेवण्यात आले असून नुकताच विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिलेला निकाल बाबासाहेबांच्या नाही, तर भाजपच्या संविधानाचा असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. पिंपरी-चिंचवडमधील शेकडो कोटी रुपयांच्या टीडीआर घोटाळ्याचा उल्लेख करीत इथेच नाही,तर राज्यात सर्वत्र प्रत्येक गोष्टीत असे घोटाळे सुरु असून आघाडीचे सरकार आल्यावर या घोटाळेबाजांना जेलमध्ये पाठवू,असे ते म्हणाले.