आदित्य ठाकरेंनी दिशा सालियानवर बलात्कार केल्याचा खोटा आरोप…

0
104
  • खुद्द देवेंद्र फडणवीस यांचे कारस्थान असल्याचा अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट
    नागपूर, दि. २४ –
    चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या गूढ मृत्यूआधी एकेकाळी त्याची मॅनेजर राहिलेली दिशा सालियन हिच्या आत्महत्येवरूनही संशय निर्माण झाला होता. यासंदर्भात अद्याप तपास चालू आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते व आमदार अनिल देशमुख यांनी या प्रकरणात थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवाय, आपण करत असलेल्या दाव्यांसाठी आपल्याकडे सबळ पुरावेही आहेत, वेळ आल्यावर मी ते पुरावे सादर करेन, असंही अनिल देशमुख म्हणाले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचा नवा कलगीतुरा सुरू होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख?
अनिल देशमुख यांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये यासंदर्भात भाष्य केलं आहे. श्याम मानव यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या दाव्यांसंदर्भात अनिल देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंना अडकवण्याचं कारस्थान झाल्याचा दावा श्याम मानव यांनी केला होता. त्यावर बोलताना अनिल देशमुख यांनी हे कारस्थान खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच केल्याचा आरोप केला आहे.

“तीन वर्षांपूर्वी प्रतिज्ञापत्र करून खोटे आरोप आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरेंवर करण्यास मला सांगण्यात आलं. मी त्याला नकार दिल्यामुळे माझ्यावर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली”, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत. “तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा अत्यंत जवळचा माणूस माझ्याकडे पाठवला. त्याने माझं देवेंद्र फडणवीसांशी अनेकदा बोलणं करून दिलं. त्यांनी माझ्याकडे एक लिफाफा पाठवला. त्यातल्या चार मुद्द्यांचं प्रतिज्ञापत्र करून देण्यास मला सांगण्यात आलं. ते जर मी करून दिलं असतं तर तेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार हे अडचणीत आले असते”, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.

“अशी तीन ते चार प्रतिज्ञापत्रं त्यांनी मला करून द्यायला सांगितली होती. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी कुणावरही खोटे आरोप करणार नाही. हे सांगितल्यामुळे, प्रतित्रापत्र करून देण्यास नकार दिल्यामुळे माझ्यामागे ईडी-सीबीआय लावून मला अटक करण्यात आली”, असं ते म्हणाले. “त्यांनी मला सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंवर मी खोटा आरोप लावायचा की त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मला पैसे जमवायला सांगितले. दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरेंवर असा आरोप लावायला सांगितलं की आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार केला आणि तिला गॅलरीतून ढकलून दिलं”, असं अनिल देशमुख म्हणाले.

“मी पुराव्यांशिवाय बोलत नाही”
“अजित पवारांवर गुटख्याच्या बाबतीत खोटा आरोप लावायचा, अनिल परबांवरही खोटा आरोप लावायचा अशी प्रतिज्ञापत्रं करण्यास मला सांगितलं होतं. मी त्याला नकार दिल्यामुळे माझ्यावर कारवाई झाली. मला हे सगळं त्यांनी सांगितलं होतं याचे पुरावेही माझ्याकडे आहेत. वेळ आल्यावर मी तुम्हाला सगळं सांगेन. कोण माणूस आला होता हेही माझ्याकडे आहे. मी पुराव्यांशिवाय बोलत नाही. देवेंद्र फडणवीसांनीच त्याला पाठवलं होतं. माझ्या शासकीय निवासस्थानी ३ वर्षांपूर्वी ही भेट झाली. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ होती. आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. उपमुख्यमंत्री अजित पवार होते”, अशा शब्दांत अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.

नकार दिल्यानंतर दुसरी ऑफर
दरम्यान, आधी नकार दिल्यानंतर पुन्हा एकदा अजित पवारांना वगळून इतर तिघांवर खोटे आरोप करण्यास सांगितल्याचं अनिल देशमुख म्हणाले. “देवेंद्र फडणवीस यांनी नंतर सांगितलं की अजित पवार तुमच्या पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्र देण्यास अडचण असेल तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्यावर आरोप करा”, असं ते म्हणाले.