आदर्श घोटाळा लपवण्यासाठी ते भाजपात गेलेत – उध्दव ठाकरे

0
203

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या विधानसभा सदस्यात्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. या प्रकरणी आता उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेना आणि राष्ट्रवादी निवडणूक आयोगाने चोरांच्या हातात दिली. आता काँग्रेस देखील अशोक चव्हाण यांच्या हातात देणार की काय? असा टोला ठाकरे यांनी लगावला. तर, अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा लपवण्यासाठी ते भाजपात गेले की काय असे म्हणत त्यांनी चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजपा भाडोत्री लोक घेत आहेत
भाजप भाडोत्री लोक घेत असून सतरंज्या उचलणाऱ्याच्या बोकांडी बसवत आहेत. आत्मविश्वास नसल्याने भाजपा फोडाफाडी करत आहेत. आणखी काही वर्षानंतर भाजपचा अध्यक्ष सुद्धा काँग्रेसमधून आलेला असेल. एकाने शिवसेना भाजपच्या ताब्यात दिली. मी आव्हान केले असून, पोलिसांना बाजूला ठेवा लोकांना गोळा करू आणि विचारू शिवसेना कुणाची आहे. मला अशोक चव्हाण यांचे आश्चर्य वाटत आहे. आजपर्यंत सगळ्या जागा वाटपात वाटून घेण्यासाठी प्रयत्न करत होते आणि आता गेले, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांच्यासह भाजपवर हल्लाबोल केला आहे.

“मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस वर्किंग कमिटी, प्राथमिक सदस्यत्त्व विधिमंडळ काँग्रेस पक्ष राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले आहे. माझी कोणाबद्दल वेगळी भावना नाही. जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं. आता मी निर्णय घेईन, दिशा ठरवेन. एक दोन दिवसात राजकीय भूमिका ठरवेन. ” ही त्यांची पहिली प्रतिक्रिया आहे. तसंच भाजपात जाणार का विचारल्यावर त्याचंही त्यांनी उत्तर दिलं.

भाजपाची कार्यप्रणाली मला माहिती नाही. मी अद्याप भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. दोन दिवसांमध्ये मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेन. असं थेट उत्तर अशोक चव्हाण यांनी दिलं आहे. आता अशोक चव्हाण यांनी जरी हे उत्तर दिलं असलं तरीही देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेनंतर आगे आगे देखो होता है क्या असं सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी चर्चा आहे.