आता ४० गद्दांराचा केवळ दोन-तीन महिन्यांचा खेळ उरलाय

0
170

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज (१६ मे) सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. यावेळी न्यायालयाने महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कारभारावर ताशेरे ओढले. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:हून राजीनामा दिल्यामुळे आम्ही त्यांचं सरकार पूनर्स्थापित करू शकत नाही, असं मतही नमूद केलं. दरम्यान, या निकालावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तसेच त्यानी एकनाथ शिंदे गटावर आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, आजचा निकाल सर्वांनी पाहिलाच असेल. मी आधीपासून बोलतोय की हे सरकार असंविधानिक, बेकायदा, अनैतिक आणि घटनाबाह्य आहे. आम्ही सतत सांगत होतो की हे राज्यपाल नव्हे तर भाज्यपाल आहेत. ते एका पक्षाची भूमिका चालवत होते. त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. सरकार पाडण्यात राज्यपालांचा हात होता ते दिसून आलं.

आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यपालांचं कार्यालय हे हुकूमशाही चालवण्यासाठी वापरलं जातंय का हे तपासणं गरजेचं आहे. तसेच राज्यांना काही अधिकार ठेवलेत का? याचं उत्तर मिळायला हवं. निकाल वाचला असेल तर लक्षात येईल की, विधानसभेचे अध्यक्ष सुनावणी घेतील तेव्हा हे आमदार अपात्र ठरतील. ४० गद्दारांचा केवळ दोन ते तीन महिन्यांचा खेळ उरला आहे. विजय हा सत्याचा होईल, सत्तेचा नाही. या सरकारमध्ये लाज उरली असेल तर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीला सामोरं जावं अशी जनतेची मागणी आहे.