आता हर्षवर्धन खरात गायबSIT चे तपास अधिकारी चक्रावले

0
4

अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण आणि कोट्यवधींची माया जमवणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या पापाचा घडा आता भरत चालला आहे. अशोक खरातप्रकरणी विविध तपास सुरु असताना सध्या पोलिसांसमोर एकामागून एक नवी आव्हाने उभी राहत आहेत. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे. त्यातच आता त्याचा मुलगा हर्षवर्धन खरात यानेही पळ काढल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. हर्षवर्धन खरातची विशेष तपास पथकाने (SIT) दोन दिवस कसून चौकशी केली होती. त्यानंतर तो अचानक नॉट रिचेबल झाला आहे.

अशोक खरातला अटक झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांकडे गुन्ह्यातील सहभागाबाबत चौकशी सुरू होती. संशयित आरोपी कल्पना खरात हिचा शोध घेत असताना पोलिसांनी मुलगा हर्षवर्धन याला ताब्यात घेतले होते. दोन दिवस चाललेल्या प्रदीर्घ चौकशीमध्ये त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. मात्र, चौकशी संपवून बाहेर पडल्यानंतर तो पोलिसांना कोणतीही माहिती न देता शहरातून गायब झाला आहे. एकाच कुटुंबातील दोन महत्त्वाचे सदस्य फरार झाल्याने या रॅकेटची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, याचा अंदाज सध्या पोलीस लावत आहेत.

मुलाने दिली होती धक्कादायक कबुली
गायब होण्यापूर्वी हर्षवर्धनने पोलिसांसमोर अत्यंत महत्त्वाचा जबाब नोंदवला होता. त्याने कबूल केले होते की, आमच्या घरात मोठ्या प्रमाणावर कॅश यायची. हे पैसे कुठून आणि कसे येत होते, याबद्दल मला काहीही माहिती नाही. त्याचे सर्व नियंत्रण डॅड अशोक खरात यांच्याकडे होते. त्यांना प्रत्येक व्यवहाराची इत्यंभूत माहिती होती, असे अशोक खरातच्या मुलाने म्हटले होते. या कबुलीमुळे अशोक खरातने केवळ आध्यात्मिक छळच नाही, तर मोठ्या प्रमाणावर काळा पैसा आणि बेनामी मालमत्ता जमवल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
दरम्यान हर्षवर्धन खरात गायब झाल्यामुळे SIT साठी तपासाची साखळी जोडणे कठीण झाले आहे. तो फरार आईच्या संपर्कात होता का? किंवा पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी तो गायब झाला आहे का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पोलीस आता तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हर्षवर्धनचा शोध घेत आहे. यामुळे नाशिकसह संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.