आता शिरूरमध्ये वंचितचे उमेदवार सर्जेराव वाघमारे

0
197

शिरूर लोकसभा मतदारसंघातून वंचितने मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द केली. त्यांच्या जागी आता वंचित बहुजन आघाडी शिरूरचा नवा उमेदवार जाहीर करणार आहे. भीमा कोरेगाव शौर्य स्तंभाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे हे आता वंचितकडून शिरूरचे उमेदवार असणार, अशी माहिती साम वृत्तवाहिनीला मिळाली आहे. बांदल यांची उमेदवारी रद्द केल्यानंतर वंचितने घेतलेल्या शोधात सर्जेराव वाघमारे यांचे नाव आघाडीवर आहे.

महाविकास आघाडीबरोबरची बोलणी फिसकटल्यानंतर वंचितने महाराष्ट्राती़ल लोकसभेचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली. त्यात शिरूरमध्ये वंचितने पैलवान मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या रूपाने वंचितला तगडा उमेदवार मिळाल्याचे बोलले जात होते. मात्र, वंचितची उमेदवारी मिळूनही बांदल यांनी पुण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. याची दखल घेत वंचितने शिरूरमधील बांदल यांची उमेदवारी रद्द केली.

बांदल यांच्यासारखा उमेदवार रद्द केल्यानंतर वंचितकडून त्यांच्या तोडीसतोड अशा उमेदवाराचा शोध घेण्यात आला. यात शिरूर लोकसभा मतदारसंघातील काही नावांची यादी तयार केली आहे. यात भीमा कोरेगाव शौर्य स्तंभाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांचे नाव आघाडीवर आहे. सर्जेराव वाघमारे शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे चोख नियोजन करत असतात. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्कही मोठा आहे.

“भाजप वगळता इतर सर्वच राजकीय पक्षांनी सध्या संविधान वाचविण्याची मोहीम उघडली आहे. त्यामुळे ते लिहिलेल्यांच्या (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर) नातवाने उमेदवारी देणे यापेक्षा आणखी काय हवे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. तसेच खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यावर सडकून टीका केली होती. कोल्हे हे पाच वर्षांत मतदारसंघात फिरकले नाहीत, तर आढळराव हे आयात उमेदवार आहेत. त्या दोघांनाही या पैलवानाचा फटका सहन होणार नाही. सहाही विधानसभा मतदारसंघांत आपली ताकद असल्याचा दावाही त्यांनी करत शिरूरमधून जिंकण्याचा विश्वासही व्यक्त केला होता.