आता शिंदे गटाचेही स्वतंत्र `सेना भवन` पिंपरी चिंचवड शहरात, महापालिका निवडणुकीसाठी जोरदार हालचाली सुरू

0
330

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे गटानेही पिंपरी चिंचवड शहरात जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पुणे शहराप्रमाणेच पिंपरी चिंचवड मध्येही आता बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे एक भव्यदिव्य `शिवसेना भवन` आकाराला येणार असून त्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात जागाही निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, संपर्क कार्यालय तात्पुरत्या स्वरुपात चिंचवडगाव येथील थेरगाव पुलाजवळील एका मंगल कार्यालयाच्या जागेत उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेळावा आणि कार्यालयाचे उद्घाटन करण्याचेही नियोजन आहे.

शिवसेना फूटल्यानंतर ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र गट केला. पाठोपाठ शिवसेनेचे १२ खासदार शिंदे यांच्या मागे गेल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला. मावळ लोकसभा मतदारसंघातील दुसऱ्यांदा निवडूण आलेले शिवसेनेचा हुकमी एक्का असलेले खासदार श्रीरंग बारणेसुध्दा शिंदे यांच्यासोबत गेल्याने पिंपरी चिंचवड शहरात शिंदे गटाला मोठी ताकद मिळाली. खासदार बारणे यांच्या बरोबर शहर शिवसेनेतील मोजके कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदे गटात आले, परंतु अद्याप त्यांची संख्या किती ते गुलदस्त्यात आहे. शहर शिवसेनेचे जवळपास ७० ते ८० टक्के लोक आमच्या बरोबर आल्याचा दावाही शिंदे गटाकडून केला जातो आहे. प्रत्यक्षात त्याची साक्ष पटलेली नाही किंवा मेळावा अथवा बैठक झालेली नसल्याने निश्चित माहिती समोर आलेली नाही. शिवसेनेच्या नऊ पैकी एकही नगरसेवक खासदार बारणे यांच्या बरोबर गेलेला नाही. आता त्याची चर्चा सुरू झाल्याने शिंदे गट जोमात कामाला लागला आहे.

मशाल हे नवीन चिन्हा मिळाल्याचे समजताच उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना गटाने आकुर्डी येथील सेनाभवना समोर मशाल घेऊन सेलिब्रेशन केले. दुसरीकडे शिंदे गटाला ढाल तलवार मिळाली, पण शहरात कुठेही त्याचे स्वागत होताना दिसलेले नाही. शहरात शिंदे गटाची ताकद आजमावण्यासाठी आता भव्य मेळाव्याचेही नियोजन सुरू असल्याचे समजले. चिंचवडगाव येथील तात्पुरत्या स्वरुपातील संपर्क कार्यालयाचे उद्घटना निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची एक भरभक्कम नावे असलेली शहर कार्यकारणीसुध्दा तयार कऱण्यात आली आहे, परंतु सर्व नावांबाबत गोपनियता बाळगण्यात आली आहे. कदाचित दोन दिवसांत संपूर्ण कार्यकारणी पत्रकार परिषदेत जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

स्वतंत्र शिवसेना भवन चिंचवड स्टेशनला –
पुणे शहरात शिंदे गटाने सारसबागेजवळ एक स्वतंत्र शिवसेनाभवन सुरू केले. वाजतगाजत त्याचे उद्घाटनही कऱण्यात आले आणि आगामी महापालिका निवडणुकिसाठी मोर्चेबांधनी देखील सुरू कऱण्यात आली. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पिंपरी चिंचवडमध्ये शिंदे गटाचे सेनाभवन होणार आहे. त्यासाठी दोन जागांची पाहणी करण्यात आली आणि चिंचवड स्टेशन पोलिस वसाहतीजवळचा एक मोकळा भूखंड त्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. पोलिसांच्या ताब्यातील एमआयडीसी च्या मालकिचा हा भूखंड आहे. आता तो भूखंड मिळविण्यासाठीची सर्व कायदेशीर पूर्तता करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. आकुर्डी येथील मूळ शिवसेना भवनाला समांतर असे एक अत्यंत अद्यावत कार्यालय इथे उभे कऱण्याचा शिंदे समर्थकांनी ठरवले आहे, असे सांगण्यात आले