मुंबई, दि. १२ (पीसीबी) : शिवसेनेचे मुख्यालय म्हणजे दादर मधील ‘शिवसेना भवन’ आणि याच शिवसेना भवना मधून शिवसेनेचा कारभार हाकला जातो. हे शिवसेना भवन म्हणजे शिवसैनिकांसाठी एक मंदिरच आहे. पण शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी करत भाजप सोबत युती करून सरकार स्थापन केलं. दरम्यान खासदार नगरसेवक आणि काही पदाधिकाऱ्यांना देखील फोडण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून झाला होता. आता शिंदे गटाकडून प्रतिशिवसेना भवन उभारून थेट मातोश्रीला आव्हान देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात.
बाळासाहेबांनी उभारलेलं शिवसेना भवन जे दादरमध्ये आहे, त्याच दादरमध्ये येत्या महिन्याभरात प्रति शिवसेना भवन उभारले जाणार आहे. तसेच प्रत्येक वार्डा वार्डात शिवसेनेच्या शाखा आहेत तशाच शाखा शिंदे गटाकडून उभारल्या जाणार आहेत. त्याचबरोबर शाखाप्रमुख विभाग प्रमुख आणि इतर पदाधिकारी देखील नियुक्त केले जाणार आहेत, अशी माहिती शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी दिली.
शिंदे गटात इन्कमिंग सुरू आहे. आता शिंदे गटाच लक्ष मुंबई महानगरपालिकेवर आहे. त्यासाठीच प्रति शिवसेना भवन, प्रति शाखा महिन्याभरात उभारण्यात येणार आहे. एवढ्यावरच न थांबता मुंबईतील शिवसेनेचे 40 ते 45 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून शिंदे गटात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. असंही सदा सरवणकर यांनी सांगितले. त्यामुळे एकनाथ शिंदे आता प्रति शिवसेनाच उभारण्याकडे भर देत आहेत, अस चित्र निर्माण झालं आहे. पण त्यात त्यांना किती यश येतं हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.