आता विश्वजित कदम भाजपामध्ये प्रवेश करणार ?

0
231

पुणे, दि. १७ (पीसीबी) : कॉंग्रेसचे पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रमुख नेते माजी मंत्री, आमदार डॉ. विश्र्वजीत कदम भारतीय जनता पार्टीत येण्याची शक्यता नाही, असे स्पष्टीकरण भाजपाचे नेते व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात दिले. दरम्यान, कदम यांचे सासरे आणि प्रख्यात कंत्राटदार अविनाश भोसले यांच्यावर ईडी कारवाई झाल्याने जावई म्हणून कदम यांची मोठी कुचंबना झाली असल्याने ते आता भाजपामध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा आहे.

‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आज पाटील यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी विश्र्वजीत कदम यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेवरून विचारलेल्या प्रश्‍नावर पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात डॉ. विश्र्वजीत कदम राज्यमंत्री होते.

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर गेल्या काही दिवसात कॉंग्रेसमधील काही नेते भाजपात दाखल होणार असल्याची चर्चा जोरात होती. त्यात पश्‍चिम महाराष्ट्रातील तगडे नेतृत्व म्हणून कदम यांचे प्रमुख नाव घेतले जात होते. कदम यांनी देखील गेल्या आठवड्यात खुलासा केला होता. मात्र, आज चंद्रकांत पाटील यांनीच कदम यांच्या भाजपा प्रवेशाची कोणतीच शक्यता नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.

‘रॅफिड फायर’ प्रश्‍न पाटील यांना विचारण्यात आले. प्रदेशाध्यक्ष की मंत्रीपद यापैकी कशाला प्राधान्य द्याल यावर पक्षासाठी प्रदेशाध्यक्षपदाला प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. पांढरा-तांबडा रस्सा की बाकरवडी या प्रश्‍नावर पाटील यांनी दोन्हीला पसंती दिली. पुणे की कोथरूड यातील प्राधान्य विचारले असता उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.

शिवसेना की एकनाथ शिंदे यांची शिवसेना असा पर्याय विचारला असता एकनाथ शिंदे सेना, असे उत्तर पाटील यांनी दिले. पनवेलमधील प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोललेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले. मी त्यावेळी जे काही बोललो त्याचा संदर्भ लक्षात न घेता माध्यमांनी सोयीची वाक्ये घेऊन बातम्या चालविल्या, असा आरोप पाटील यांनी केला.