…आता विधानपरिषदेच्या मैदानात पुन्हा सामना रंगणार

0
233

मुंबई, दि. १३ (पीसीबी) : राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी रंगणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष उभे राहिलेले सदाभाऊ खोत आाणि पूरक अर्ज भरलेले राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे यांनी माघार घेतली आहे. पण, महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून दुसरा उमेदवार मागे घेण्यास नकार देण्यात आल्याने महाआघाडी विरोधात भाजप असा सामना पुन्हा रंगणार आहे. दरम्यान, आमचा पाचवा उमेदवार जिंकणारच, असा ठाम विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्याने ही लढाईसुध्दा मोठी रंगतदार होणार आहे. २० जून रोजी मतदान होणार आहे.

विधान परिषदेचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यात अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत, तर एकनाथ खडसे यांना पूरक म्हणून भरलेला अर्ज शिवाजीराव गर्जे यांनी माघारी घेतला. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, राम शिंदे आणि उमा खापरे हे भाजपकडून, राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे, शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश्या पाडवी, काँग्रेसकडून भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे हे अकरा उमेदवार रिंगणात असणार आहेत.

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून सहा, तर भाजपकडून पाच उमेदवार रिंगणात असणार आहेत. शेवटच्या मिनिटांपर्यंत ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र, काँग्रेस आणि भाजपही आपापल्या म्हणण्यावर ठाम राहिले. १० जागांसाठी मतदान होणार आहे. गुप्त मतदान पद्धती हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य असणार आहे. खरी मेख तेथेच असणार आहे. कारण राज्यसभा निवडणुकीत पक्षाच्या आमदारांना आपले मत संबंधित प्रतोदांना दाखवावे लागते. येथे मात्र गुप्त मतदान असल्याने घोडेबाजार रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सत्तारुढ पक्षांनी ही निवडणूक बिनविरोध करावी, यासाठी आमची अपेक्षा होती. सत्तारुढ पक्षातील काही लोकांनी तसे प्रयत्न केले होते. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. पाचवी जिंकण्याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे. काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा, यासाठी संबंधितांनी प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसने उमेदवार मागे घेण्यास नकार दिल्याने ही निवडणूक लागली आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.