आता विकासाची व्याख्या बदलावी – संजय राऊत

0
220

मुंबई, दि. २ (पीसीबी) – विधीमंडळातील धक्काबुक्की आणि शाब्दिक चकमकीचे पडसाद काल विधीमंडळात दिसून आले. आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पण याप्रकरणी राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला. विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी याप्रकरणी मत व्यक्त करावे. आता विकासाची व्याख्या बदलावी, असा टोला त्यांनी राज्य सरकारला हाणला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पण निशाणा साधला.

राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी 70 हजार कोटींचा सिंचन घोटळा, आदर्श घोटाळ्याचे आरोप पंतप्रधानांनी केले होते, याची आठवण राऊत यांनी करुन दिली. पण हेच लोक भाजपमध्ये गेल्यावर ते वॉशिंग मशीनमधून स्वच्छ होऊन बाहेर पडतात, त्यांना घेऊन मोदी हे देश चालवत असल्याचा टोला त्यांनी लगावला. त्यामुळेच आता विकासाची व्याख्या बदलावी लागणार असल्याचा चिमटा त्यांनी सत्ताधाऱ्यांना काढला. या राज्याशी, देशाशी खोटं बोलण्यात येत आहे. राज्याचा विकास होत असल्याचे खोटं सांगण्यात येत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा निशाणा साधला.

सध्या सत्ताधारी पक्षात गँगवार सुरु आहे. गँगमध्ये सुद्धा गँगवार सुरु असल्याचा चिमटा त्यांनी काढला. शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांमध्ये गँगवार सुरु आहे. मुंबईतील अंडरवर्ल्ड आम्ही पाहिले आहे. तसेच शिंदे गटातील एक मंत्री आणि एक आमदार यांच्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळेच विकासाची व्याख्या आता बदलणे आवश्यक असल्याचा टोला त्यांनी हाणला. मी महाराष्ट्रात जोरदार विकास होत असल्याचे पत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लिहिणार असल्याचा टोला त्यांनी हाणला. आता हाच विकास असल्याचे ते म्हणाले.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्य शेवटच्या दिवशी सत्ताधारी पक्षातील कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात विधीमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की झाल्याचे समोर आले. शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी करुन वाद सोडवला. यावरुन आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यावर जोरदार हल्लाबोल केला.