मुंबई, दि. ५ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पक्षाला उभारी देण्याचा निश्चय केला होता. त्यामुळे त्यांची पहिली सभा छगन भुजबळांचा मतदारसंघ येवल्यात संपन्न झाली. आता दुसरी सभा बीडमध्ये होणार आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. आता लढायचे आहे, तयारीला लागा असे आवाहन शरद पवार यांनी केले.
मागील महिन्यात २ तारखेला अजित पवारांनी अचानक सत्तापक्षाला समर्थन देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड केलं. सुरुवातीला ९ आमदारांनी शपथ घेतली. पुढे त्या आमदारांना खात्यांचं वाटप झालं. अजित पवार यांच्यासोबत ४५ आमदार असल्याचं सांगितलं जातं. काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत स्पष्टपणाने भाष्य केलं.
अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी,असे प्रसंग आपल्या आयुष्यात यापूर्वी आलेले आहेत; असं सांगत लढण्याची भूमिका घेतली होती. त्यांनी पहिली सभा नाशिकच्या येवल्यात घेऊन रणशिंग फुंकलं होतं. त्यावेळी त्यांनी येवलेकरांची माफी मागून भुजबळांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर राज्य विधीमंडळाचं अधिवेशन सुरु झालं. काल अधिवेशन संपल्यानंतर आज शरद पवारांनी बीडच्या सभेची घोषणा केली आहे. वरळीतल्या नेहरु सेंटर येथे इंडिया आघाडीच्या बैठकीसंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक बैठक संपन्न झाली. त्यापूर्वी शरद पवारांनी त्यांच्या गटाच्या नेत्यांची बैठक घेतली होती.
याच बैठकीमध्ये शरद पवारांनी आपल्या लढायचं असून पुन्हा जोमाने कामाला लागण्याचं आवाहन केलं. येवल्यानंतर दुसरी सभा बीडमध्ये होणार आहे. बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे सभेची जबाबदारी देण्यात आलेली आहे. आजच्या बैठकीमध्ये शरद पवारांनी आगामी दौऱ्यांबाबत चर्चा केली.