आता रिक्षा चालक मालकाने लाखोच्या संख्येने २८ नोव्हेंबर २०२२, रोजी होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावे

0
245

पुणे येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायत स्टॅन्ड प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बाबा कांबळे यांचे रिक्षा चालकांना आवाहन.

पुणे, दि. २३ (पीसीबी) – बेकायदेशीर टू व्हीलर बैईक व इतर विविध प्रश्नांमुळे, रिक्षा व्यवसाय संपुष्टात आला असून रिक्षा चालकांचे जगणं मुश्किल झाले आहे. सर्वच रिक्षा संघटना आपापल्या परीने प्रयत्न करत असून सरकार दरबारी विविध मागणीसाठी आंदोलन केले आहे, परंतु सरकारने आश्वासनाच्या पलीकडे कोणतेही प्रश्न सोडवले नाही.आता पुणे शहरातील सर्व संघटना एक झाल्या असून रिक्षा चालक मालकाने देखील एकीचं बळ दाखवून लाखोच्या संख्येने एकत्र येऊन 28 नोव्हेंबर २०२२ रोजी होणारे आंदोलन यशस्वी करावे. आता नाही तर कधीच नाही हा आपल्या जीवन मरणाची लढाई आहे या लढाईमध्ये आपल्याला यश मिळवायचे आहे, असे महाराष्ट्र रिक्षा संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने पिंपरी कार्यालय व पुणे येथील मंगळवार पेठ येथील कार्यालयात रिक्षा स्टॅन्ड प्रमुख व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी बाबा कांबळे बोलत होते. महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर कोर कमिटीचे विलास केमसे पाटील ,मोहम्मद भाई शेख,माझी अध्यक्ष शफिक भाई पटेल, रिक्षा ब्रिगेड प्रमुख बाळासाहेब ढवळे, पुणे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण शेलार, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख संजय दौंडकर, रवींद्र लंके, तोफिक कुरेशी, किरण एरंडे, संजय शिंदे, अन्सार शेख, उपस्थित होते.

बाबा कांबळे म्हणाले, रिक्षा संघटनेने आपल्यातले मतभेद बाजूला ठेवून, रिक्षा चालकांच्या हितासाठी एकत्र येणे आवश्यक आहे ज्या संघटना अजूनही आंदोलनामध्ये सहभागी झाल्या नाहीत त्यांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावे. रिक्षा चालकांचे प्रश्न अत्यंत बिकट व गंभीर होत आहे त्यांच्या प्रश्नांवरती एकत्र येऊन लढण्याची वेळ आहे. शेतकऱ्यांप्रमाणे रिक्षा चालकांना देखील आत्महत्या करावे लागेल. यापूर्वी देखील आठ रिक्षाचालकांंनी आत्महत्या केल्या आहेत. कोरोना नंतर अनेक रिक्षालकांच्या रिक्षा ओढून नेल्या. आता त्यांचे संसार हळूहळू रुळावर येत आहेत.

मोठ्या भांडवलदार विरोधातील लढा –
भांडवलदारांच्या विरोधामध्ये हा लढा आहे. रिक्षा व सेवा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलदार येत असून केंद्र व राज्य सरकार भांडवलदारांच्या फायद्याचे निर्णय घेत आहे. त्यांच्या सोयीचे कायदे करत आहे. यातून पूर्वपार चालत आलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था रिक्षासारखी व्यवस्था मेटाकुटीला आले असून त्यावर अवलंबून लाखो रिक्षा चालक मालकांचे संसार उध्वस्त होत आहेत. ही लढाई खूप अवघड आहे, परंतु सर्वजण एकत्र आल्यास ती अधिक सोपी होईल. रिक्षा संघटनेचे नेते केशव क्षीरसागर, अशोक साळेकर, आनंद तांबे, आनंद अंकुश,संजय कवडे, किशोर चिंतामनी हे सर्व मंडळी प्राणपणाने लढा देत आहेत. रिक्षा चालकांसाठी लढणाऱ्या संघटनांच्या पाठीशी रिक्षा चालक मालकांनी खंबीर पणे उभे राहावे, असे आवाहन देखील यावेळी बाबा कांबळे यांनी केले